Tuesday, 21 December 2021

डाळिंबं..

सकाळी गावात गेलो होतो. फिरून परत घराकडे येताना वाटेत बाजाराच्या बाहेर नेहमीचे फळवाले होतेच. त्यांच्याकडे नेहमीच लक्ष जात असतं, आज पण गेलंच.  बाजाराचा दिवस असल्यानं वेगवेगळी भरपूर फळ आलेली दिसली.  एका फळवाल्याकडे  डाळिंबं खूप दिसली आणि अगदी रसरशीत होती. ती डाळींबं अक्षरशः काही वेळ बघत थांबलो. लाल रंगाच्या भुलवून टाकणाऱ्या अफाट छटा बघत राहिलो. घरी आलो तरी ते रंग ती रसरशीत डाळींबं डोक्यातून जाईनात. मग दुपारी पुन्हा जाऊन ती डाळींबं घेऊनचं आलो..खोलीतल्या टेबलावर ठेवून दिली समोरच.रंगानी किती मोहक असावं...सारखं तिकडं लक्ष जात राहिलं. खिडकीतून येणारा प्रकाश बदलत जाईल तसे रंग बदलत निघाले होते..प्रकाशाशी रंगांचा तो चाललेला खेळ डोळ्यांमधून मग प्यालेट पर्यंत आणि तिथून कॅनव्हास वर उतरलाच शेवटी...
©अन्वर हुसेन 2021

Thursday, 11 November 2021

दिवाळीचे दिवस

*अंधार उजळून टाकणारे दिवे*

शाळेला सुट्या लागल्या की कधी एकदा गावाकडे, बुधगांवला जाऊ अस वाटत रहायचं. उन्हाळ्याच्या सुटीची वेगळी मजा असायची आणि दिवाळीच्या सुट्टीची वेगळीच मजा असायची.कधीतरी दूसरी तिसरीत असताना बुधगाव सोडून इस्लामपूरला रहायला आलो आम्ही. वडीलांच्या नोकरीच्या ठिकाणी. बुधगावात मन रमवायला खुप काही होतं. मित्र होते, आवडत्या जागा होत्या, राजवाडा, झाडं, आजी आजोबा, 'ते' घर, त्याच्या अंगणातलं पेरूचंझाड...दिवाळीच्या सुट्टीत खास आकर्षण म्हणजे दिवाळीचे ते 4 -5 दिवस. पण आधी आठवडाभर लगभग चालू व्हायची ती म्हणजे किल्ला करण्याची. घराच्या अंगणात किल्ला करायचो मी. गावातले मित्र यायचे मदतीला. किल्ल्यासाठी दगड माती विटाअसं सगळं कुठून कुठून गोळा करून आणायचो. राजवाड्याच्या भिंतीलगत रस्त्याकडेला बरेचसे दगड सापडायचे तिथून दगड उचलून आणायचो. मातीसाठी मात्र एकखास ठिकाण होतं. आणि ती मातीही खासचं असायची. गावातली सगळी पोरं किल्ला करण्यासाठी तीच माती वापरायचे. दिवाळी आधी किल्ला करण्याची लगभग सुरू झाली की गावातली बहुतेक पोरं पोती घेवून, सायकली घेवून गावाबाहेर कवलापूर रस्त्यावर असलेल्या इदगाह मैदानाच्या दिशेन जाताना दिसायची. गावाबाहेर जाणाऱ्या रस्त्याच्या डावीउजविकडच्या संस्थान कालीन सुंदर दगडी इमारती बघत, मजेत दोन्ही बाजूला असणाऱ्या वड चिंचेच्या डेरेदार झाडांच्या सावलीतून जाताना खूप आनंद वाटायचा. इदगाच्या जवळ मोठी मोकळी जागा होती. तिथलं वैषिष्ट्य म्हणजे तिथली माती मस्त लाल रंगाची होती. त्या मातीचं सगळया पोरांना आकर्षण होतं. गावातल्या सगळ्या पोरांचे किल्ले लाल मातीचेच दिसायचे. त्या मोकळ्या जागेत माती होती त्यात पण लाल रंगाच्या वेगवेगळ्या छटा दिसायच्या, पण सगळ्या पोरांना अगदी रसरशीत लाल रंग जिथं दिसायचा त्या ठिकाणचीच माती घ्यायची असायची. त्यामुळे गल्लीगल्लीतल्या प्रत्येक पोरांच्या टोळीची घाई चाललेली असायची तिथून माती काढायला. माती काढण्यासाठी प्रत्येकजण मिळेल ते हत्यार घेवून आलेला असायचा. स्क्रूड्रायव्हर, खुरपं, कुणी टिकाव घेवून यायचं. काढलेली माती पोत्यात भरायची , ते पोतं सायकलच्या मधल्या त्रिकोणी भागात व्यवस्थित ठेवायचं. माती काढून झाली की शेजारी इदगाह होता त्याला लागूनच कब्रस्तान होतं तिथं बोरिंग होतं तिथं पाणी हापसून हाथ पाय धुवायचे. तिथं कब्रस्तानाच्या आवारात एक प्रचंड मोठं पिंपळाचं झाड जे अजूनही आहे, ते झाड खुप आवडायचं. इदगाह मैदानातली ती पांढरी भिंत जिथं इदला वडील आजोबा आणी घरातल्या इतरांबरोबर नमाज पढायला जायचो. गावाबाहेरच्या माळावरच्या त्या पांढऱ्या भिंतीबद्दल काहीतरी कुतूहल मनात नेहमी वाटत रहायचं त्या वेळी .विशेषतः त्या भिंतीच्या दोन्ही कडेला असलेल्या त्या जराशा उंच गोल दगडी मिनारांबद्दलच कुतूहल खूप होतं. वर्षातून दोनदाच तिथं माणसं दिसायची. इतर वेळी सुनसान असायच. दिवाळीत माती आणायला गेलो की माती काढता काढता मधेमधे तिकडं लक्ष जात रहायचं, ती पांढरी भिंत आणी समोरचा तो चबुतरा एकाकी असल्यासारखे दिसायचे..माती काढून झाली की मग ती घेवून घराकडे परत फिरायचं. दगड विटा रचून मनाप्रमाणे किल्ला बांधून तयार असायचा, आणलेली माती आता त्या किल्ल्यावर थापायची. त्यासाठी मग त्या मातीचा चिखल करायचा. पाहिजे त्या प्रकारचा. आणी किल्ला आणि त्याच्या आसपासचा परिसर लिंपून घ्यायचा. हे सगळं होत जाईल तसा किल्ल्याचा नूर पालटून जायचा लाल रंगाच्या मातीत किल्ल्याचं सौदर्य वेगळच वाटू लागायचं. किल्ल्याचे बुरुज, वाघासाठी गुहा , महाराजांसाठी खास तयार केलेली जागा किल्ल्याच्या   खालचं गाव ,शेतं, विहीर हे सगळं करताना किती रमून जायचो,दिवसच्या दिवस अक्षरशः....सोबतीला गावातले मित्र असायचे रमेश, शब्बीर आणी कोण कोण...किल्ला झाला कि त्यावर मोहरी टाकायची. दोन चार दिवसात ती उगवून यायची ही हिरवी गार कोवळे अंकुर किल्ला जीवंत करून टाकायचे एकदम. गावातल्या एका दुकानात किल्ल्यावरची चित्रं मिळायची. दरवर्षी तिथून दोनचार नवीन मावळे घेवून यायचो. घरातल्या एक पत्राच्या चौकोनी डब्यात किल्ल्यावरची चित्रं जपून ठेवली होती आज्जीने. किल्ला तयार झाला की तो डबा फळीवरून काढायचा. दिवाळीला फटाक्यांपेक्षा किल्ला या गोष्टीचं खूप आकर्षण होतं. दिवाळीच्या आदल्या दिवशी वडील सांगलीहून येताना फटाके घेवून यायचे. ते घेवून मग दिवाळीच्या दिवशी मित्रांसोबत फटाके उडवत फिरायचो. किल्लाच्या लगबगी सोबतच घरात आई आज्जीची वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवण्याची लगबगही चालू झालेली असायची. चकल्याचिवडालाडूशेव सगळं घरात तयार व्हायचं. बेसनचे लाडू तर खूप खास असायचे, त्याची सगळी तयारी आजोबा स्वतः करून द्यायचे. बेसन किती प्रमाणात भाजून घ्यायचं, कसा रंग आला की थांबायचे, तुप किती प्रमाणात घालायचं सगळ स्वतः करायचे. माझ्या आईला त्यांनी लाडू करायला शिकवले. तिच्याही हातच्या लाडवाला अप्रतीम चव आहे. आजोबांच्या हातच्या लाडवा सारखीच. दिवाळीत आणखी एक गोष्ट खूप लहाणपणापासून घरात बघत आलोय ती म्हणजे दिवाळी अंक. मौज, हंस, आवाज असे अंक वडील आणायचे. प्राथमिक शाळेत असण्याचा तो काळ तेव्हा वाचायचा फार काही नाद नव्हता. पण त्या दिवाळी अंकामधली चित्रं मात्र बघत रहायचो. मुखपृष्ठावरची चित्रं, आतमध्ये बारीक काळ्या रेषांनी काढलेली चित्रं खूप गुंगवून टाकायची. खूप आवडायची. ते दिवाळी अंक गावाकडच्या घरात कित्येक वर्षे जपून ठेवले होते एका कपाटात. दर सुट्टीत गेलो की दुपारच्या वेळी तो गठ्ठा काढून त्यातली ती चित्रं बघत रहायचो.पुढं चित्रकलेकडे वळलो, चित्रकारांबद्दल माहिती होवू लागली, चित्र बघण्यात येवू लागली अनेकांची, तेव्हा कळलं लहानपणी जी रेखा चित्रं दिवाळी अंकांतून बघत रहायचो ती बाळ ठाकूर, सुभाष अवचट अशा चित्रकारांची होती.आज जेंव्हा मी स्वतःच माझ्या चित्राबद्दल विचार करत राहतो तर मला लहाणपणी दिवाळी अंकामधून पाहिलेली ती चित्रं त्या सुंदर रेषा यांचा प्रभाव जाणवत राहतो. दिवाळीच्या दिवसांमधला अजून एक खूपच आवडणारा प्रकार म्हणजे सर्वत्र उजळलेले दिवे. गावभर सर्व घराघरांमध्ये पणत्या त्यांचा तो पिवळसर उष्ण प्रकाश, अंधार उळजवून टाकणारा... मनालाही उजळवून टाकतो. दिवाळीच्या दिवसात घरभर,अंगणात, फाटकापाशी, पायऱ्यांवर सर्वत्र दिवे लावायला आणी तो प्रकाश डोळ्यांत, मनात भरून घ्यायला खूप आनंद होतो. तोच प्रकाश मग माझ्या दिवाळीच्या चित्रांमध्येही उजळत राहतो. आता किल्ला , त्यासाठी माती दगड गोळा करणे फटाके उडवणे हे मागं पडून गेलंय, आता माझ्या साठी दिवाळीचे दिवस म्हणजे अंधार उजळवून टाकणारे दिवे, मनाला नवी उर्मी देणारे दिवे, आनंद, उत्साह पसरवणारा प्रकाशाचा सण...

©अन्वर हुसेन

(31 ऑक्टोबर 2021
दैनिक सामना
उत्सव, दिवाळी विशेष)

Tuesday, 10 August 2021

हिवाळ्यातली दुपार..

हिवाळ्यातली एक शांतपणे पुढे सरकत निघालेली दुपार
खिडकीतून आत आलेले उन्हाचे काही तुकडे माझ्या आसपास रेंगाळतायत
क्षणाक्षणाला आकार बदलतायत ते तुकडे
प्यालेट वर रंग मिसळता मिसळता माझं 
त्या तुकड्यांकडं लक्ष जात राहतं..
उबदार वाटतं बघूनच तिकडं.
झळाळते आकार.. हवेहवेसे...
खोलीतल्या घड्याळाची एकसारखी टिकटिक वातावरण गंभीर करतेय उगीचच
कॅनव्हास वर रंग लावताना होणारा ब्रश चा आवाज मधेच शांततेला तडा देतोय..
बाहेरच्या हॉल मध्ये रेडिओ वर गाणी चालू आहेत, 
तीही अगदी हळुवार आवाजात..
या रेडिओवर लागणाऱ्या गाण्यामध्ये 
काही वेळा काही गाणी अनपेक्षित पणे समोर येतात...
हॉल मधून येणाऱ्या बासरीच्या संथ सुरांनी  लक्ष वेधून घेतलं..
आह...! त्या क्षणी सगळं गाणं मनात तरळू लागलं
बासरी च्या पाठोपाठ 
'आपकी याद आती रही रात भर...'
तिचा विरह वेदनेत भिजलेला आवाज..
त्या सुरांनी त्या शांत दुपारचा नूर बदलून टाकला..
त्या गाण्यातल्या शब्दांमध्ये आपसूकच
ओढला गेलो..
गाण्यातली रात्र, ती कुठंतरी दूर त्याच्या पासून..
त्याची याद बेचैन करतेय तिला..
माझ्या प्यालेट वरच्या ग्रे रंगात मला त्या गाण्यातली उदासी मिसळून गेल्यासारखी दिसू लागली..
आणि चित्रात गाण्यातल्या प्रतिमा उतरल्यासारख्या..
'याद के चांद दिल मे उतरते रहें
चांदनी जगमगाती रही रात भर'..
चित्रात आलेला ग्रे रंग चित्राला वेगळाच अर्थ देऊन गेला..
त्या हिवाळ्यातल्या शांत दुपारी...

अन्वरहुसेन2020
©anwarhusain21

Wednesday, 31 March 2021

क्या तुम्हें पता है विन्सेन्ट


क्या तुम्हें पता है विन्सेन्ट
किंवदंती बन गए हो तुम तो
फ़िल्मे बना रहे है लोग 
तुम्हारी जिंदगी पर
किताबें लिख रहे है
कविताएँ लिखी जाती है तुम पर
चित्रों का विषय बन रहे हो तुम
तुम्हारी चित्रों का विश्लेषण कर कर
तुम्हे जानने की कोशिशें चल रहीं हैं 
म्यूजियम में तुम्हारे चित्र देखने के लिए
क़तारें लग जाती है 
भावविभोर हो जाते है तुम्हारे चाहनेवाले
आँखे भर आती है 
जब रूबरू होते है तुम्हारी पेंटिंग्स के
कहना जो चाहा था तुम ने 
वो दृश्यसंगीत लोग सुन पा रहें है अब
जिन जिन जगहों को तुमने कैनवास पे रंग दिया
वहां जा कर रोमांचित हो जाते  है लोग
ब्रैंड बन गए हो तुम एक
पता है तुम्हे.. रंग बिक रहें है तुम्हारे नाम से 
महेंगे है लेकिन
तुम शायद ही खरीद पाते
कितनी जद्दोजहद की थी 
रंगों और कैनवास के लिए तुमने
सोचता हूँ, कि तुम कैसा महसूस करते
अगर तुम्हारे चित्रों की नीलामी की कीमतें सुनते
चेहरे पर शायद हल्की सी व्यंग्य भरी मुस्कान आ भी जाती
वो दिल चिरने वाली उदास आँखे 
चमक उठती एक पल के लिए
और अगले ही पल अपना इज़ेल कैनवास रंग ब्रश उठा 
तुम चमचमाती धूप के तलाश में निकल पड़ते
तुम्हारे आंखों से रिसता दर्द 
उदास कर देता है 
जब भी तुम्हारे सेल्फ पोर्ट्रेट्स सामने आ जाते है
पढा है मैंने,
पागलपन की हद तक तुम्हारे 
पीली धूप के लिए भटकने के बारे में
और फिर उसे रंगों मे मिलाकर 
बेतहाशा कैनवास पे बिछा देना 
चित्रों में महसूस किया है...
और पढा है
तुम्हारे गहरे अवसाद की अवस्था के बारे में
तुम्हारे एकाकीपन, बेचैनी के बारे मे
उपेक्षा से आहत तुम्हारे मन को
जान सकता हूँ
खबरें आती है
तुम्हारे चित्रों के रेकॉर्ड कीमतों में बिकने की या 
किसी नए फ़िल्म की तुम्हारी जीवनी पे बन रही
कमरे में टंगे तुम्हारे सेल्फ पोर्ट्रेट की तरफ नजर जाती है
तुम्हारी आंखों से रिसता दर्द उदास कर देता है

©अन्वर हुसेन2020

#जनमदिन_मुबारक_विन्सेन्टवैनगोग #30मार्च
#almirah_2007 #soloshow 

Friday, 26 March 2021

बाजार

तसं तर आजकाल रोजच मंडई भरत असते. पण गुरुवार आणि रविवारच्या बाजाराची गोष्टच वेगळी आहे.आठवड्यात हे दोन बाजार अगदी भरगच्च भरतात. अगदी रसरसलेला माहौल असतो बाजार परिसरात. सकाळपासून हा माहौल जमायला सुरु होतो. पण खरा रंग चढतो दुपार नंतर. दररोज ची मंडई असून ही बाजारच्या या दोन्ही दिवशीही प्रचंड गर्दी भाजीपाला आणि इतर अनेक गोष्टी खरेदी करण्यासाठी होते. आसपासच्या खेड्यांमधुन शेतकरी त्यांचा माल घेऊन येतातच शिवाय लोकही खास बाजारासाठी येत असतात. बाजारात वेगवेगळ्या वेळी फिरणं हा एक भन्नाट अनुभव असतो. सकाळच्या वेळचा बाजार वेगळा दुपारचा  वेगळा संध्याकाळी तर खूपच वेगळा असतो बाजार. बहुतेकदा संध्याकाळी चालत बाहेर पडत असतो तेंव्हा वेगवेगळ्या रस्त्याने फिरत असतो. पण बाजारच्या दिवशी मात्र बाजारच्या परिसराकडेच जावंसं वाटत. मग संध्याकाळच्या वेळेला ऐन भरात आलेला बाजार बघत फिरत राहतो. ती सगळी जिवंत दृश्य मनात साठत जातात. मग थोडावेळ      रस्त्यापलीकडच्या दुकानाच्या पायरीवर उभं राहून तो बाजार बघण्यात जातो. बऱ्यापैकी अंधार पडलेला असतो. समोर तो नेहमीचा हलवेकरी आणि त्याचं भरगच्च दुकान बल्ब च्या उजेडात उजळलेलं दिसत असतं. चिरमुरे फरसाण, शेव,गोडीशेव पापडी, तऱ्हेतऱ्हेच्या मिठाया खाजा,बालुशाही, म्हैसूरपाक, बुंदीचे लाडू आणि काय काय बरंच.. असं सगळं भरगच्च...बाकी सगळा बाजार करून झाला की काही लोक त्या मिठाईवाल्या कडे वळतात..मग त्याच्याकडून काही मिठाईफरसाणचिरमुरे असं काहीतरी घेतल्यावर त्यांच्या बाजार प्रकरणाची सांगता होते. ते सगळं नुसतं बघत रहायला सुद्धा छान वाटतं. 

मागे एकदा असंच संध्याकाळी बाजार बघत उभा होतो तर समोरच दिसणाऱ्या मिठाईवाल्याच्या दुकानाचं स्केच करावंसं वाटलं. 

©अन्वर हुसेन2021
2021/25/3

Monday, 11 January 2021

रिक्षावाला

रिक्षावाला
गावाकडच्या घरात एक रिक्षावाला भाडेकरू रहायचा.  त्याची कधीकधी आठवण येते. आता तो एक साधासुधा रिक्षा चालवणारा माणूस तर त्याची आठवण कुणी का ठेवावी आणि इतक्या 35-40 वर्षांनंतर ही तो का आठवावा. तर त्याला कारणही तसंच आहे. अगदी लहान होतो. शाळेतही जात नव्हतो अजून. तो रिक्षावाला आणि त्याची बायको दोघेचं त्या गावाकडच्या घरातल्या एका खोलीत रहायला आले. तो दिवसभर सांगलीत रिक्षा चालवायचा. संध्याकाळी परतायचा. त्याची रिक्षा घराच्या अंगणात लावलेली असायची. त्या रिक्षाचं आकर्षण वाटू लागलेलं. ड्रायव्हिंग सीट वर बसून उगीच चालवायची ऍक्टिंग करायला मजा यायची . खेळायला एक नवी चीज मिळाली होती. तो माणूस पण भारी होता. एखादं दिवशी कामावरून लवकर यायचा घरी परत. त्या दिवशी बायकोला घेऊन कुठंतरी बाहेर जायचा. रात्री उशिरा यायचा. एक दिवस असाच लवकर आलेला होता, त्या दिवशी घरात आजी आणि आई ची ही कुठं बाहेर जाण्याची तयारी चाललेली होती आणि अर्थातच मी पण त्यांच्या सोबत जाणारच होतो. सांगलीला जायचं असं काहीतरी चाललेलं. आणि जायचं होतं ते त्या रिक्षावाल्याच्या रिक्षातून. ते कळल्यावर खूप आनंद वाटलेला. दुपारीच निघालो. मुळात कधीतरी क्वचित कधीतरी अशा मोठया शहरात जायला मिळायचं. त्याच आकर्षण होतं. तर त्या दिवशी आम्ही मिरजेला गेलो. कुठला तरी हिंदी सिनेमा बघायला गेलेलो. बहुतेक क्रांती सिनेमा होता तो असं पुसट आठवतय. त्या नंतर मिरजेच्या उरसात फिरलेलो. आईने आजीने तिथून काही भांडी विकत  घेतलेली. काही खेळणीही घेयलेली. दर्ग्यात गेलो होतो. त्या नंतर परत यायला निघालो अंधार पडला होता आता. शहरातल्या रस्त्यावरच्या लाईट्स ,दुकानातल्या लाईट्स सगळीकडे चकचकाट बघून वाटलेलं आश्चर्य अजूनही मनात ताजं आहे. अगदी लहानश्या गावातून बाहेर पडून पहिल्यांदाच अशी शहरी रात्र अनुभवत होतो. रस्त्यावर  काही थिएटर दिसली जिथे पोस्टर्स लावलेली दिसली त्यांच्यावरचे बल्ब च्या उजेडात उजळलेले चेहरे मात्र ओळखीचे वाटत होते. पेपर, मासिकं आणि घराशेजारच्या तंबू मध्ये सिनेमे लागले की त्यांची पोस्टर्स तंबू च्या बाहेर तिकिटासाठी पत्र्याचं केबिन केलेलं त्याच्या वर लावलेलं असायचं. दुसरं पोस्टर एसटी स्टँड वर. त्यावर बघून बघून ते चेहरे ओळखीचे झाले होते. त्या तंबूमध्ये ही खूप सिनेमे बघितले. बहुतेक बच्चन चे असायचे. तंबूत रात्री सिनेमा चालू झाला की अगदी घरात ऐकू यायचं. गाणी तर व्यवस्थित ऐकू यायची. नंतर तो रिक्षावाला अनेकदा त्या दोघांबरोबर मलाही सांगलीला घेऊन जाऊ लागला. सांगलीत त्याचे कोणी मेहमान रहायचे. तिथं जायचो. थोडा वेळ थांबून, काही वेळा जेवण करून परत यायचो. मला त्याचा सोबत शहरात जायला आवडायचं. रिक्षामधून संध्याकाळ, रात्रीच ते शहर ती दुकानं गजबजलेले रस्ते वाहनं सिनेमांची पोस्टर्स जाहिराती शहरातल्या दिव्यांची रोषणाई बघत जायला यायला खुप मजा यायची. त्या पुढे त्या रिक्षावाल्याच्या बायकोला मूल झालं. त्या मुलाचं बारसं त्यांनी त्यांच्या जवळच असलेल्या गावाकडे केलेलं. त्यासाठी मी आजी आणि माझा चाचा त्या गावात मुक्कामाला जाणाऱ्या एसटीने संध्याकाळी गेलो होतो. घर पाहुण्यांनी भरलेलं. संध्याकाळी त्या रिक्षावाल्यानं रेकॉर्ड प्लेअर वर हिंदी गाणी लावलेली कुरबानी, डॉन ,क्रांती असल्या काय काय सिनेमातली गाणी. रात्री गावातली लाईट गेलेली मग..घरभर अंधार. तशात त्या बाळाचं नाव ठेवायचा कार्यक्रम..चिमणी कंदिलाच्या उजेडात जेवणं..उशिरा रात्री लोकांच्या गप्पा ऐकत कधी झोप लागली कळलं नाही. सकाळी मग मुक्कामाच्या त्या एसटीने परत घरी. पुढे काही दिवसानी तो आमच्या घरातली खोली सोडून गेला. आम्हीही वडिलांच्या नोकरीच्या गावात रहायला आलो. रिक्षावाला कुठं असेल काय माहीत आता...

©अन्वर हुसेन/8 जानेवारी21

टुरिंग टॉकीज

गावातल्या त्या घराशेजारी टुरिंग टॉकीज होती. सिनेमाचा तंबू. रात्री तंबू मध्ये चालू असलेल्या सिनेमाचा आवाज व्यवस्थित घरात ऐकू यायचा. ते ऐकत ऐकत झोप कधी लागायची ते कळायचं नाही. पलीकडे थोड्या अंतरावर राजवाड्याच्या तटाच्या बाजूला दुसरा तंबू होता. मला घराशेजारचा हा तंबू आवडायचा. ऐसपैस जागेवर होता. रात्री आठ वाजत आले की तंबूतली माणसं दोघे मिळून बाजूच्या कनाती बांधून घ्यायच्या कमला लागायची. ते झालं की मुख्य पडदा चढवला जायचा. कर्णे, स्टेरिओ बॉक्स सगळी जुळणी होईस्तोवर नऊ वाजत यायचे तोवर मागे ब्याकग्राऊंड ला गाणी चालू असायची. नऊ ला पाच मिनिटं कमी असताना आरती लागायची तोवर तिकडे तिकीट खिडकी उघडलेली असायची. तिथं बल्ब च्या पिवळ्या धम्मक उजेडात एकजण तिकीट द्यायला चालू करायचा. त्याचा तो बल्ब च्या उजेडातला चेहरा आठवतो अजून. त्या केबिनच्या वर चालू सिनेमाचं मोठं पोस्टर असायचं. दिवसा तंबू समोरून जाता येता तर पोस्टर बघायचोच, रात्री ते पोस्टर आणखी भारी वाटायचं. रात्री पोस्टर वर मोठा बल्ब लावलेला असायचा. लक्ख पिवळसर उजेड असलेला. पोस्टर नेमकं फोकस व्हायचं. नट नट्यांचे चेहरे त्यावरचे एक्स्प्रेशन खिळवून ठेवायचे. खूप वेळ बघत रेंगाळायचो त्या तंबू समोर. बहुतेक सगळे ऍक्शनपॅकड सिनेमे. त्या काळात खूप सिनेमे बघितले तंबूत. बच्चन चे कित्येक सिनेमे त्या तंबूतच बघितलेले. डॉन दिवार मुकद्दर का सिकंदर कालिया जंजीर काला पत्थर आणि काय काय...या सगळ्या सिनेमांची गाणी डायलॉग रोज सिनेमा चालू झाला की घरात ऐकू यायचे..जाता येता पोस्टर बघायचो ती पोस्टर्स पण वेड लावायची. आवडायचं ते बघत उभं रहायला. अनेकदा ती पोस्टर्स हाताने रंगवलेली असायची. सिनेमा बदलायच्या दिवशीची उत्सुकता असायची. कधी जाऊन पोस्टर बघतोय असं व्हायचं. मग कधीकधी त्या तंबुवाल्याच्या खोली समोरून उगीच चकरा मारायचो. तिथं सिनेमाच्या रिळांच्या पेट्या, पोस्टरं स्पीकर बॉक्स, बरंच तंबूशी संबंधित समान पडलेलं असायचं. त्याला कधीकधी विचारायचो उद्या कुठला 'पिच्चर' लागणार आहे...तिथं पोस्टर्स चिकटवायच काम चालू असायचं. ते बघत रहायचो. मग त्या खोलीत पोरांची गर्दी व्हायला लागायची तसं तिथला माणूस सगळ्यांना बाहेर घालवायचा. पोस्टर वर त्या बच्चन च्या किंवा जो कुणी असेल नट त्याच्या चेहऱ्यावर चे भाव त्यासाठी वापरलेले वेगळेच रंग भारी वाटायचं. ते अफाट स्ट्रोक्स .फिगर्स मधली गतिमानता. अजूनही ती पोस्टर्स डोळ्यांसमोर येतात. अँग्री यंग मॅनची इमेज तयार होण्यात कुठेतरी या बोल्ड पोस्टर्स चा ही नक्कीच वाटा आहे.
मनात रुतून राहिलेल्या अनेक प्रतिमा आहेत त्या पैकी  अनेक प्रतिमा या सिनेमांमधल्या या पोस्टर वर झळकलेल्या प्रतिमा आहेत. मधे मधे त्या तरळत वर येत राहतात...


©अन्वर हुसेन/8जानेवारी21

स्केच बुक

कॉलेजमध्ये असताना स्केचबुक असायचं जवळ. त्यात स्केचेस करायचो कधी कधी. शिक्षकांनी सांगितलेलं असायचं, उद्या येताना दहा स्केचेस पाहिजेत. मग कॉले...