Saturday, 4 June 2022

स्केच बुक

कॉलेजमध्ये असताना स्केचबुक असायचं जवळ. त्यात स्केचेस करायचो कधी कधी. शिक्षकांनी सांगितलेलं असायचं, उद्या येताना दहा स्केचेस पाहिजेत. मग कॉलेज सुटल्यावर बस स्टॉपवर नाहीतर टपरीवर बसायचं. स्केचेस कधी व्हायची, कधी नाही. वर्गात कम्पोजिशन द्यायचे सर, विषय वगैरे... तीन रफ स्केच करायचीच. त्यातलं एक फायनल. हा प्रकार कधी जमायचा नाही. दाखवण्यापुरतं मग काहीतरी करायचो. सरळ कॅनव्हासवर मनात येत जाईल तसं काम करत रहायचो. स्केचबुकातलं स्केच आणि कॅनव्हासवरचं चित्र यांचा दूरवर काही संबंध नसायचा. आर्ट स्कुल मधल्या एकुणच काळात स्केचबुक बरोबर असचं थोडसं अंतरावरचंच नातं होत. पुढं तिथुन बाहेर पडल्यावर मधला काळ एकंदरीत अस्पष्ट, गोंधळाचा संभ्रमित काळ होता, तसा तो अजुनही मधेअधे  येतोच. सतत काही शोधत रहायचो. खूपच अस्वस्थ काळ. हे करून बघू ते करून बघू... एकाच वेळी अनेक दिशांनी ठेचकाळत प्रवास..व्यक्त होण्यातल्या मर्यादा..मनातली भिती. हे सगळं कुणाला सांगावं.. कॅनव्हास समोर जावं, तर तो  दडपून टाकायला बघायचा सगळं. त्याच्या शुभ्रपणा समोर पुन्हा घुसमट. खुप वैयक्तिक स्वतःपुरतं काही तरी पाहिजे होतं. स्केचबुक ची आठवण आली मग. छोट्या आकाराची ती पिवळसर पानं जवळची वाटू लागली. त्यात मग वाट्टेल ते करत राहिलो, मनात येईल तसं. सतत सोबत असावं ते स्केचबुक असं वाटू लागलं. आर्ट स्कुल मध्ये असताना स्केचबुकशी असलेलं मेकॅनिकल नातं पार बदलून गेलं. स्केचबुक हे निव्वळ रफ स्केच करण्याचं ठिकाण न राहता खूप जवळची गोष्ट बनून गेलीय आता. त्यात व्यक्त होतो माझ्यातला संभ्रम, गोंधळ, कुतूहल, असंख्य चुका, अचानकपणे गवसलेले काही आकार, रेषांसोबत केलेले मनसोक्त खेळ, त्यातल्या शक्यता, स्केचबुकच्या पानांमधूनच सापडलेला मुंबई डायरीच्या चित्रांसाठीचा फॉर्म..असंख्य नोंदी निसर्गाच्या, माणसांच्या, शहरांच्या, गावांच्या, रस्त्यांच्या कशाकशाच्या....
तर माझ्यासाठी स्केचबुक हे असं काहीतरी आहे. व्यक्त होण्यासाठीचं स्वतंत्र ठिकाण. त्याचं असं अस्तित्व असलेलं.  मला स्केचबुक आणि माझी चित्रं हे समांतर पणे जात असताना दिसतात, कधी एकमेकांचं प्रतिबिंब एकमेकात पडलेलं जाणवतं. 

©अन्वर हुसेन मार्च 2022

Saturday, 5 February 2022

चित्रकार अभिनेता...

चित्रकार अभिनेता...
बुधगाव च्या जिल्हा परिषदेच्या शाळेत बहुतेक दुसरी च्या वर्गात असेन, एक दिवस शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सिनेमा दाखवायला नेलं होतं. गावातच. बुधगावात त्यावेळी दोन सिनेमाचे तंबू होते. त्यातला एक तर घराच्या अगदी शेजारीच होता. रोज रात्री नऊ च्या दरम्यान सिनेमा चालू व्हायचा तिथे. पण शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी त्या दिवशी सिनेमाची वेळ लवकरची ठेवली होती. थोडासा अंधार पडल्यावर लगेचच सिनेमा सुरू झाला होता. तो सिनेमा म्हणजे छत्रपती शिवाजी. त्यापूर्वी चित्रात, पुस्तकात, गावातल्या किराणा मालाच्या दुकानात शिवाजी महाराजांची मोठी फ्रेम केलेली तसबीर बघत असायचो. पडद्यावर  पहिल्यांदाच बघत होतो. त्या वयात त्या सिनेमाचा तो अनुभव इतका विलक्षण होता की नंतर पुढे छत्रपती शिवाजी महाराज म्हंटलकी त्या सिनेमात ज्या अभिनेत्याने ती भूमिका साकारली होती तीच प्रतिमा मनावर कोरली गेली. नंतर कित्येक अभिनेत्यांनी महाराजांची भूमिका साकारली पण अजूनही ती लहानपणी गावातल्या तंबूत पाहिलेल्या सिनेमातल्या अभिनेत्याने साकारलेली महाराजांची प्रतिमा जशीच्या तशी आहे. त्या वेळी तो अभिनेता आहे, तो कोण, त्याच नाव काहीही माहिती नव्हतं. नंतर त्या सगळ्या गोष्टी कळल्या. चंद्रकांत मांढरे यांनी ती भूमिका साकारलेली. शिवाजी महाराज म्हणजे चंद्रकांत मांढरे  हे मनावर बिंबूनचं गेलं. पुढं टीव्ही आले सगळीकडे. घरी पण आला. त्यावर मराठी सिनेमे लावायचे, मग बऱ्याचदा चंद्रकांत मांढरे दिसायचे. त्यांना सिनेमात बघायला भारी वाटायचं.
अगदी शेवटी त्यांना बनगरवाडी सिनेमात बघितलं होतं.
पुढं हायस्कुल झालं. चित्रकलेचा नाद लागला. पेन्सिल शेडिंग करायचो त्यावेळी. फारसं कुणाचं मार्गदर्शन वगैरे न घेताच जमेल तसं प्रयत्न करायचो. 10 वी च्या परिक्षे नंतर च्या सुट्ट्या होत्या. एक दिवस पेपर मध्ये वडिलांनी एक बातमी दाखवली. बातमीत लिहिलं होतं, प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रकार चंद्रकांत मांढरे सुट्टीमध्ये पावडर शेडिंग ची कार्यशाळा घेणार आहेत. बातमी वाचून आधी तर आश्चर्य वाटलं. आश्चर्य या साठी की चंद्रकांत मांढरे एक अभिनेते म्हणूनच आजवर माहीत होते ते चित्रंही काढतात हे माहीत नव्हतं. वडील म्हणाले बघूया जाऊन कोल्हापूरला. त्यांनी वेळ दिली होती त्या वेळेला गेलो दिलेल्या पत्त्यावर. तिथं गेलो, बरीच मूलं- मुली तिथं आलेली होती. त्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळच्या उजवीकडच्या खोलीत आम्हाला बाहेरच्या माणसाने पाठवलं. आत गेलो तर तिथं   प्रत्यक्ष चंद्रकांत मांढरे समोर बसलेले. क्षणभर बघतच राहिलो त्यांच्याकडे. या वयातही किती रुबाबदार वाटत होते. वडिलांनी त्यांना सांगितलं, आम्ही कशासाठी आलोय ते. त्यांनी मग मला काही चित्रं  आणली आहेत का ते विचारलं. अर्थातच मी चित्रांची फाईल घेऊन गेलोच होतो. त्यातली चित्रं त्यांना दाखवू लागलो एक एक करून. बघता बघता ते मला काही विचारतही होते चित्रांबद्दल.  शिवाय पुढे काय करायचा विचार आहे त्याबद्दल ही विचारलं त्यांनी. तो पर्यंत आर्ट स्कुल ला जायचं विचार चाललेला होताच. कमर्शियल आर्ट करायचं असं काहीतरी चाललं होतं. तर त्यावर ते म्हणाले कमर्शियल कशाला फाईन आर्ट कडे घे ऍडमिशन. आपल्या मनासारखी चित्रं काढायची. मग ते जे मार्गदर्शन कार्यशाळा घेणार होते त्याबद्दल त्यांनी सांगितलं. रोज इस्लामपूर हुन येणार की इथंच कुठं राहणार...असं काय काय बोलणं झालं. त्या कार्यशाळेत त्यांनी मला प्रवेश दिला. आनंदात तिथून बाहेर पडलो. बाहेर आणखी एक उत्सुकता लागून राहण्याची गोष्ट आल्याआल्या बघितली होती. ती म्हणजे त्या बंगल्यात असलेलं म्युझियम. ते बघायचंच होतं मला. आत गेलो तर तिथं त्यांनी केलेल्या अनेक भूमिकांचे फोटोग्राफ्स लावले होते. पुढं त्यांची पावडर शेडिंग ची, वॉटरकलर मधली, ऑइल कलर मधली कित्येक चित्रं होती. जिथं जिथं ते शूटिंग साठी जायचे तिथं त्यांच्या सोबत चित्रकलेचं साहित्य असायचंच. शुटिंग मधून थोडा वेळ मिळाला मोकळा की ते चित्रात रमून जायचे. अशी शेकडो जल रंगातली निसर्ग चित्रं त्यांनी केली. ती त्या म्युझियम मध्ये पहायला मिळाळी. यातली काही चित्रं खूपच आवडून गेली. पन्हाळ्यावरची चित्रं, गुलमोहराचं चित्र,गुऱ्हाळाची चित्रं...आणि त्यांनी केलेलं शिवाजी महाराजांचं छोटंसं चित्र तर अप्रतिमच वाटतं मला.  तिथून बाहेर पडलो ती सगळी चित्रं मनात घेऊनच. पण पुढे काही कारणाने मला त्या पावडर शेडिंग च्या कार्यशाळेला जाता आले नाही. पुढच्या सुट्टीत नक्की जाऊ असं ठरवलं, पण तेही नाहीच जमलं. 
नंतर आर्ट स्कुल ला ऍडमिशन घेतली. सांगलीला, कलाविश्वला. 
कोल्हापूर ला यायला नेहमीच आवडतं. खूप आवडत्या गावांपैकी आहे कोल्हापूर. तर मधेअधे काहीतरी निमित्ताने किंवा उगीचच कोल्हापूर ला येत राहतो. मग टाऊन हॉल म्युझियम, शाहू स्मारक , भवानी मंडप, एखाद्या चित्रकार मित्राचा स्टुडिओ असं भटकत रहाणं ठरलेलं असतं. कधीतरी मांढरेच्या म्युझियम पण आठवण येते  तेव्हा तिथं पण चक्कर होतेच. पुन्हा एकदा ती सगळी चित्रं बघण्यात एक आनंद मिळतो. 
मधे एकदा मुलांना घेऊन असंच फिरत फिरत हायवे सोडून जोतिबा कडे जाणाऱ्या रस्त्याला गेलो. नेमका गुऱ्हाळं चालू असण्याचा सीझन होता. त्या भागात अनेक गुऱ्हाळं चालू होती. सगळ्यांची लगबग जाणवत होती. वाटेवरच्या जवळपास प्रत्येक गुऱ्हाळा पाशी थांबून मुलांना आतून बाहेरून ती दाखवली. ती गुऱ्हाळं बघत असताना मला मांढरेची चित्रं खूप आठवत राहिली. ती चित्रं बघायची तीव्र इच्छा झाली.   त्या परिसरातून फिरून तिथून कोल्हापुरात आलो. आणि सरळ मांढरेच्या म्युझियम मधेच आलो. आणि ती चित्रं पुन्हा पहिली. तो मुलांसाठी ही खूप वेगळा अनुभव होता नुकतीच बघितलेली गुऱ्हाळं, तिथं काम करणारी माणसं, ती तापलेल्या काहिलीतून उठणारी वाफ, ते धुराडं, त्यातून बाहेर पडणारा धूर.  तो सगळा परिसर, तो माहौल इथं येऊन चित्रात बघताना खूप वेगळा अनुभव वाटला.  
चंद्रकांत मांढरेची चित्रं बघताना  त्यात कोल्हापूरच्या मातीचा तो गंध अक्षरशः जाणवतो. त्या चित्रांत एक अनघड असा गोडवा आहे. तो अनुभव पुन्हा पुन्हा घ्यावा वाटतो. आजच्या मॉडर्न आर्ट ,समकालीन कला या सगळ्यात त्यांची चित्रं कुठं बसतात हे सगळं माझ्यासाठी गौण आहे. ती चित्रं मला एक अनुभूती देतात. त्यात उतरलेलं कोल्हापूर आणि तिथला भवताल मी महसुस करू शकतो ही गोष्ट माझ्यासाठी खूप आनंद देणारी आहे. मला त्यांची चित्रं आवडतात.

आज त्यांचा जन्म दिन..

अन्वर हुसेन/13ऑगस्ट2021

सुंदर वास्तूंचं दुर्लक्षित गाव..

सुंदर वास्तूंचं दुर्लक्षित गाव..
कळायला लागल्यापासून  काळ्या दगडातली ती भक्कम तटबंदी डोळ्यांसमोर दिसत होती. घराच्या समोरच. लांब रुंद पसरलेली. त्या तटबंदीत बरीच खोल्या होत्या. काही एकमजली काही दुमजली कौलारू. बाहेरून अनेक खिडक्या दिसत रहायच्या. त्या ही बारीक जाळी लावलेल्या. त्यामुळे आत नेमकं काय आहे हे कळायचं नाही. तटबंदीच्या मध्य भागी प्रचंड उंच कमान. वरच्या बाजूला अर्ध गोल आकार असलेली. कमानीच्या वर एक चौरसाकृति खोली. तिला समोरच्या बाजूला लाकडी गॅलरी सारखा भाग. तिथं येण्यासाठी दरवाजा आणि त्या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या उभट आकाराच्या खिडक्या. कमानी ला दोन्हीकडे मजबूत लोखंडी गेट. असा एकूण माहौल. खूप गूढ आणि भीतीदायक वाटायचं तेंव्हा. त्या तटबंदी च्या खोल्यांमध्येच मराठी शाळा भरायची. शाळेत जायचं वय झाल्यावर गावात एकच शाळा असल्याने साहजिकच त्याच शाळेत जावं लागलं. मग रोज त्या तटबंदीच्या आत जावं लागायचं. त्या गूढ वातावरणात. सगळं गाव राजवाडा म्हणायचं या इमारतीला. रोज जाऊन बऱ्यापैकी सरावलो.  तटबंदी च्या आत मोठं मोकळं आवार आणि मधल्या जागेत आणखी एक मोठाली इमारत होती. प्रचंड मोठा लाकडी दरवाजा दिसायचा. कायम कुलूपबंद असलेला. निर्मनुष्य. सगळ्या खिडक्या बंद. मधल्या सुट्टीत त्या दरवाज्या जवळ जाऊन मुलं खेळत बसायची. मोठाल्या दरवाज्याच्या फटीतून आत काय दिसतंय का याची खूप उत्सुकता असायची. आतमध्ये मोठा दगडी चौक दिसायचा. उंचच उंच खांब कट्टे आत आत गेलेले गर्द काळोखात मर्ज होऊन जाताना दिसायचे.  तो स्तब्ध गर्द अवकाश संबंध परिसर आणि इमारतीबद्दल वाटणारं गूढ आणखी वाढायचा.  पुढं मित्रांबरोबर किंवा एकटाच गावात वेगवेगळ्या ठिकाणी खेळायला किंवा उगीचंच हिंडत रहायचो तर गावात अशा प्रकारच्या अनेक इमारती दिसू लागल्या.  गावातलं पोस्ट ऑफिस, सरकारी दवाखाना, ग्रामपंचायतीची अतिशय देखणी इमारत, कवलापूर रस्त्याला ईदगाह मैदानाच्या वाटेवर असलेल्या इमारती , ब्रिटिश शैलीतले बंगले, गावाबाहेर एकाकी असलेलं मंदिर, गावाला वेढा घालणारा तो रस्ता, ज्याला सगळे चक्कर सडक म्हणतात. जिमखाण्याची इमारत त्याच्या शेजारी असलेली पुस्तकांनी भरलेली लायब्ररीची इमारत.अशा गावभर असलेल्या इमारतींविषयी आणि इतर गोष्टींविषयीकुतूहल वाटू लागलं. याची रचना, आकार, ते ऐसपैस व्हरांडे, दुसर्या कुठल्या गावात तेंव्हा असं काही सहसा दिसायचं नाही. त्यामुळे बुधगाव म्हणजे वेगळंच गाव वाटायचं. मग हळूहळू समजत गेलं की हे गाव म्हणजे संस्थान होतं पूर्वी. पटवर्धन इथले संस्थानिक होते. आणि घरासमोर जी अवाढव्य तटबंदी आहे तो त्यांचा रहायचा वाडा होता एके काळी. गावातल्या अनेक दुकानात घोड्यावर बसलेल्या, शिकार केलेल्या प्राण्यांसोबत, त्या उंच कमानी समोर घोड्यावर बसून काढलेले अनेक ब्लॅक व्हाइट फोटो दिसत रहायचे. त्या इमारती, ते गावभर दिसणारे फोटो यातून संस्थानिकांचा एके काळाचा रुबाब दिसत रहायचा. पुढं आणखी गोष्टी कळत गेल्या हे मिरज ज्युनियर संस्थान म्हणतात. मिरज संस्थानांत वाटणी होऊन हा भाग वेगळा झालेला.  बुधगाव त्याची राजधानी होती. हा झाला भूतकाळ . पण मी शाळेत असताना  त्या संस्थानिकांचे जे वारस मला दिसायचे गावात ते त्या वाड्याच्या तटबंदीमध्ये असलेल्या छोट्या खोल्यांमध्ये राहताना दिसत होते. सकाळी रोज त्यातल्या एकाला रिक्षा घेऊन जाताना मी बघायचो. कधीतरी तटबंदीच्या आत जो मुख्य राजवाडा होता तो पाडून टाकला त्यांनी. त्या वाड्यातले जे काही लाकडी खिडक्या चौकटी सागवानी उंचच उंच खांब सगळं विकून टाकलं. त्यातल्या काही खिडक्या चौकटी गावातल्या अनेक लोकांनी विकत घेऊन वापरल्या. आतल्या मोकळ्या जागा प्लॉट पाडून विकून टाकल्या. तटबंदी अगदी अलिकडे पर्यंत चांगल्या अवस्थेत होती तिची ही दुरवस्था होत निघाली आहे. राजवाड्याच्या कामानीच्या वरच्या भागात 1905 या सालाचा उल्लेख दिसायचा. ते म्हणजे तो राजवाडा बांधून पूर्ण झाल्याचं साल होतं.  होता. बालगंधर्व या वाड्यात येऊन रहायचे त्यांना इथं बघितलेले गावात अनेक लोक होते. आहेत.  उस्ताद अब्दुल करीम खां साहेब जेंव्हा मिरजेत आले तेंव्हा दर्ग्यातल्या हजेरी नंतर त्यांचा पहिला जाहीर जलसा बुधगावच्या संस्थनिकांकडे झाला होता. असा त्यांच्या चरित्रात उल्लेख आहे. त्यांना बुधगावकरांनी स्वतःची बग्गी पाठवून बोलावून घेतले होते.  अशा त्या काळातल्या अनेक मोठ्या कलावंताची ये जा या गावात असायची. त्या काळच्या अनेक भल्याबुऱ्या गोष्टी लहाणपणी ऐकल्या होत्या. तो काळ प्रत्यक्ष अनुभवलेल्यांपैकी आता कुणी क्वचितच हयात असेल. गावातल्या लोकांना आणि एकूणच लोकप्रतिनिधी प्रशासनाला आता त्या इमारती त्यातलं सौंदर्य त्यांचं ऐतिहासिक महत्व या विषयी कुठलीही आस्था दिसत नाही. हळूहळू त्या इमारती काळाच्या ओघात नष्ट होऊन जातील. सद्या काही इमारती अतिशय दुरावस्थेत आहेत. एकंदरीतच लहान पाणी अनुभवलेलं गावाचं सुंदर टुमदार रूप जाऊन गाव बकाल होऊन गेलंय. सध्या त्या इमारती वापरणार्यांनी आपापल्या सोयीनुसार गरजेनुसार चित्रविचित्र विसंगत जोड काम केलं आहे. पण तरीही गावात ज्या काही इमारती आत्ता अस्तित्वात आहेत त्यावरून त्यांच्या त्या काळातल्या वैशिष्ट्य पूर्ण सौंदर्याची कल्पना येऊ शकते. त्या काळातल्या वास्तूकलेचं एक रूप काही अंशी बुधगाव मध्ये अजूनही अनुभवता येऊ शकतं. सांगली पासून अगदी जवळ असलेलं बुधगाव हे वास्तू सौंदर्याची अनेक उदाहरणं असलेलं तरीही दुर्लक्षित असलेलं गाव आहे असं वाटत राहत. एकूणच या गावाच्या इतिहासाचा वेगवेगळ्या संदर्भाने  शोध घेतला गेला पाहिजे असं सतत वाटतं. 

©अन्वर हुसेन.

Tuesday, 21 December 2021

डाळिंबं..

सकाळी गावात गेलो होतो. फिरून परत घराकडे येताना वाटेत बाजाराच्या बाहेर नेहमीचे फळवाले होतेच. त्यांच्याकडे नेहमीच लक्ष जात असतं, आज पण गेलंच.  बाजाराचा दिवस असल्यानं वेगवेगळी भरपूर फळ आलेली दिसली.  एका फळवाल्याकडे  डाळिंबं खूप दिसली आणि अगदी रसरशीत होती. ती डाळींबं अक्षरशः काही वेळ बघत थांबलो. लाल रंगाच्या भुलवून टाकणाऱ्या अफाट छटा बघत राहिलो. घरी आलो तरी ते रंग ती रसरशीत डाळींबं डोक्यातून जाईनात. मग दुपारी पुन्हा जाऊन ती डाळींबं घेऊनचं आलो..खोलीतल्या टेबलावर ठेवून दिली समोरच.रंगानी किती मोहक असावं...सारखं तिकडं लक्ष जात राहिलं. खिडकीतून येणारा प्रकाश बदलत जाईल तसे रंग बदलत निघाले होते..प्रकाशाशी रंगांचा तो चाललेला खेळ डोळ्यांमधून मग प्यालेट पर्यंत आणि तिथून कॅनव्हास वर उतरलाच शेवटी...
©अन्वर हुसेन 2021

Thursday, 11 November 2021

दिवाळीचे दिवस

*अंधार उजळून टाकणारे दिवे*

शाळेला सुट्या लागल्या की कधी एकदा गावाकडे, बुधगांवला जाऊ अस वाटत रहायचं. उन्हाळ्याच्या सुटीची वेगळी मजा असायची आणि दिवाळीच्या सुट्टीची वेगळीच मजा असायची.कधीतरी दूसरी तिसरीत असताना बुधगाव सोडून इस्लामपूरला रहायला आलो आम्ही. वडीलांच्या नोकरीच्या ठिकाणी. बुधगावात मन रमवायला खुप काही होतं. मित्र होते, आवडत्या जागा होत्या, राजवाडा, झाडं, आजी आजोबा, 'ते' घर, त्याच्या अंगणातलं पेरूचंझाड...दिवाळीच्या सुट्टीत खास आकर्षण म्हणजे दिवाळीचे ते 4 -5 दिवस. पण आधी आठवडाभर लगभग चालू व्हायची ती म्हणजे किल्ला करण्याची. घराच्या अंगणात किल्ला करायचो मी. गावातले मित्र यायचे मदतीला. किल्ल्यासाठी दगड माती विटाअसं सगळं कुठून कुठून गोळा करून आणायचो. राजवाड्याच्या भिंतीलगत रस्त्याकडेला बरेचसे दगड सापडायचे तिथून दगड उचलून आणायचो. मातीसाठी मात्र एकखास ठिकाण होतं. आणि ती मातीही खासचं असायची. गावातली सगळी पोरं किल्ला करण्यासाठी तीच माती वापरायचे. दिवाळी आधी किल्ला करण्याची लगभग सुरू झाली की गावातली बहुतेक पोरं पोती घेवून, सायकली घेवून गावाबाहेर कवलापूर रस्त्यावर असलेल्या इदगाह मैदानाच्या दिशेन जाताना दिसायची. गावाबाहेर जाणाऱ्या रस्त्याच्या डावीउजविकडच्या संस्थान कालीन सुंदर दगडी इमारती बघत, मजेत दोन्ही बाजूला असणाऱ्या वड चिंचेच्या डेरेदार झाडांच्या सावलीतून जाताना खूप आनंद वाटायचा. इदगाच्या जवळ मोठी मोकळी जागा होती. तिथलं वैषिष्ट्य म्हणजे तिथली माती मस्त लाल रंगाची होती. त्या मातीचं सगळया पोरांना आकर्षण होतं. गावातल्या सगळ्या पोरांचे किल्ले लाल मातीचेच दिसायचे. त्या मोकळ्या जागेत माती होती त्यात पण लाल रंगाच्या वेगवेगळ्या छटा दिसायच्या, पण सगळ्या पोरांना अगदी रसरशीत लाल रंग जिथं दिसायचा त्या ठिकाणचीच माती घ्यायची असायची. त्यामुळे गल्लीगल्लीतल्या प्रत्येक पोरांच्या टोळीची घाई चाललेली असायची तिथून माती काढायला. माती काढण्यासाठी प्रत्येकजण मिळेल ते हत्यार घेवून आलेला असायचा. स्क्रूड्रायव्हर, खुरपं, कुणी टिकाव घेवून यायचं. काढलेली माती पोत्यात भरायची , ते पोतं सायकलच्या मधल्या त्रिकोणी भागात व्यवस्थित ठेवायचं. माती काढून झाली की शेजारी इदगाह होता त्याला लागूनच कब्रस्तान होतं तिथं बोरिंग होतं तिथं पाणी हापसून हाथ पाय धुवायचे. तिथं कब्रस्तानाच्या आवारात एक प्रचंड मोठं पिंपळाचं झाड जे अजूनही आहे, ते झाड खुप आवडायचं. इदगाह मैदानातली ती पांढरी भिंत जिथं इदला वडील आजोबा आणी घरातल्या इतरांबरोबर नमाज पढायला जायचो. गावाबाहेरच्या माळावरच्या त्या पांढऱ्या भिंतीबद्दल काहीतरी कुतूहल मनात नेहमी वाटत रहायचं त्या वेळी .विशेषतः त्या भिंतीच्या दोन्ही कडेला असलेल्या त्या जराशा उंच गोल दगडी मिनारांबद्दलच कुतूहल खूप होतं. वर्षातून दोनदाच तिथं माणसं दिसायची. इतर वेळी सुनसान असायच. दिवाळीत माती आणायला गेलो की माती काढता काढता मधेमधे तिकडं लक्ष जात रहायचं, ती पांढरी भिंत आणी समोरचा तो चबुतरा एकाकी असल्यासारखे दिसायचे..माती काढून झाली की मग ती घेवून घराकडे परत फिरायचं. दगड विटा रचून मनाप्रमाणे किल्ला बांधून तयार असायचा, आणलेली माती आता त्या किल्ल्यावर थापायची. त्यासाठी मग त्या मातीचा चिखल करायचा. पाहिजे त्या प्रकारचा. आणी किल्ला आणि त्याच्या आसपासचा परिसर लिंपून घ्यायचा. हे सगळं होत जाईल तसा किल्ल्याचा नूर पालटून जायचा लाल रंगाच्या मातीत किल्ल्याचं सौदर्य वेगळच वाटू लागायचं. किल्ल्याचे बुरुज, वाघासाठी गुहा , महाराजांसाठी खास तयार केलेली जागा किल्ल्याच्या   खालचं गाव ,शेतं, विहीर हे सगळं करताना किती रमून जायचो,दिवसच्या दिवस अक्षरशः....सोबतीला गावातले मित्र असायचे रमेश, शब्बीर आणी कोण कोण...किल्ला झाला कि त्यावर मोहरी टाकायची. दोन चार दिवसात ती उगवून यायची ही हिरवी गार कोवळे अंकुर किल्ला जीवंत करून टाकायचे एकदम. गावातल्या एका दुकानात किल्ल्यावरची चित्रं मिळायची. दरवर्षी तिथून दोनचार नवीन मावळे घेवून यायचो. घरातल्या एक पत्राच्या चौकोनी डब्यात किल्ल्यावरची चित्रं जपून ठेवली होती आज्जीने. किल्ला तयार झाला की तो डबा फळीवरून काढायचा. दिवाळीला फटाक्यांपेक्षा किल्ला या गोष्टीचं खूप आकर्षण होतं. दिवाळीच्या आदल्या दिवशी वडील सांगलीहून येताना फटाके घेवून यायचे. ते घेवून मग दिवाळीच्या दिवशी मित्रांसोबत फटाके उडवत फिरायचो. किल्लाच्या लगबगी सोबतच घरात आई आज्जीची वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवण्याची लगबगही चालू झालेली असायची. चकल्याचिवडालाडूशेव सगळं घरात तयार व्हायचं. बेसनचे लाडू तर खूप खास असायचे, त्याची सगळी तयारी आजोबा स्वतः करून द्यायचे. बेसन किती प्रमाणात भाजून घ्यायचं, कसा रंग आला की थांबायचे, तुप किती प्रमाणात घालायचं सगळ स्वतः करायचे. माझ्या आईला त्यांनी लाडू करायला शिकवले. तिच्याही हातच्या लाडवाला अप्रतीम चव आहे. आजोबांच्या हातच्या लाडवा सारखीच. दिवाळीत आणखी एक गोष्ट खूप लहाणपणापासून घरात बघत आलोय ती म्हणजे दिवाळी अंक. मौज, हंस, आवाज असे अंक वडील आणायचे. प्राथमिक शाळेत असण्याचा तो काळ तेव्हा वाचायचा फार काही नाद नव्हता. पण त्या दिवाळी अंकामधली चित्रं मात्र बघत रहायचो. मुखपृष्ठावरची चित्रं, आतमध्ये बारीक काळ्या रेषांनी काढलेली चित्रं खूप गुंगवून टाकायची. खूप आवडायची. ते दिवाळी अंक गावाकडच्या घरात कित्येक वर्षे जपून ठेवले होते एका कपाटात. दर सुट्टीत गेलो की दुपारच्या वेळी तो गठ्ठा काढून त्यातली ती चित्रं बघत रहायचो.पुढं चित्रकलेकडे वळलो, चित्रकारांबद्दल माहिती होवू लागली, चित्र बघण्यात येवू लागली अनेकांची, तेव्हा कळलं लहानपणी जी रेखा चित्रं दिवाळी अंकांतून बघत रहायचो ती बाळ ठाकूर, सुभाष अवचट अशा चित्रकारांची होती.आज जेंव्हा मी स्वतःच माझ्या चित्राबद्दल विचार करत राहतो तर मला लहाणपणी दिवाळी अंकामधून पाहिलेली ती चित्रं त्या सुंदर रेषा यांचा प्रभाव जाणवत राहतो. दिवाळीच्या दिवसांमधला अजून एक खूपच आवडणारा प्रकार म्हणजे सर्वत्र उजळलेले दिवे. गावभर सर्व घराघरांमध्ये पणत्या त्यांचा तो पिवळसर उष्ण प्रकाश, अंधार उळजवून टाकणारा... मनालाही उजळवून टाकतो. दिवाळीच्या दिवसात घरभर,अंगणात, फाटकापाशी, पायऱ्यांवर सर्वत्र दिवे लावायला आणी तो प्रकाश डोळ्यांत, मनात भरून घ्यायला खूप आनंद होतो. तोच प्रकाश मग माझ्या दिवाळीच्या चित्रांमध्येही उजळत राहतो. आता किल्ला , त्यासाठी माती दगड गोळा करणे फटाके उडवणे हे मागं पडून गेलंय, आता माझ्या साठी दिवाळीचे दिवस म्हणजे अंधार उजळवून टाकणारे दिवे, मनाला नवी उर्मी देणारे दिवे, आनंद, उत्साह पसरवणारा प्रकाशाचा सण...

©अन्वर हुसेन

(31 ऑक्टोबर 2021
दैनिक सामना
उत्सव, दिवाळी विशेष)

Tuesday, 10 August 2021

हिवाळ्यातली दुपार..

हिवाळ्यातली एक शांतपणे पुढे सरकत निघालेली दुपार
खिडकीतून आत आलेले उन्हाचे काही तुकडे माझ्या आसपास रेंगाळतायत
क्षणाक्षणाला आकार बदलतायत ते तुकडे
प्यालेट वर रंग मिसळता मिसळता माझं 
त्या तुकड्यांकडं लक्ष जात राहतं..
उबदार वाटतं बघूनच तिकडं.
झळाळते आकार.. हवेहवेसे...
खोलीतल्या घड्याळाची एकसारखी टिकटिक वातावरण गंभीर करतेय उगीचच
कॅनव्हास वर रंग लावताना होणारा ब्रश चा आवाज मधेच शांततेला तडा देतोय..
बाहेरच्या हॉल मध्ये रेडिओ वर गाणी चालू आहेत, 
तीही अगदी हळुवार आवाजात..
या रेडिओवर लागणाऱ्या गाण्यामध्ये 
काही वेळा काही गाणी अनपेक्षित पणे समोर येतात...
हॉल मधून येणाऱ्या बासरीच्या संथ सुरांनी  लक्ष वेधून घेतलं..
आह...! त्या क्षणी सगळं गाणं मनात तरळू लागलं
बासरी च्या पाठोपाठ 
'आपकी याद आती रही रात भर...'
तिचा विरह वेदनेत भिजलेला आवाज..
त्या सुरांनी त्या शांत दुपारचा नूर बदलून टाकला..
त्या गाण्यातल्या शब्दांमध्ये आपसूकच
ओढला गेलो..
गाण्यातली रात्र, ती कुठंतरी दूर त्याच्या पासून..
त्याची याद बेचैन करतेय तिला..
माझ्या प्यालेट वरच्या ग्रे रंगात मला त्या गाण्यातली उदासी मिसळून गेल्यासारखी दिसू लागली..
आणि चित्रात गाण्यातल्या प्रतिमा उतरल्यासारख्या..
'याद के चांद दिल मे उतरते रहें
चांदनी जगमगाती रही रात भर'..
चित्रात आलेला ग्रे रंग चित्राला वेगळाच अर्थ देऊन गेला..
त्या हिवाळ्यातल्या शांत दुपारी...

अन्वरहुसेन2020
©anwarhusain21

Wednesday, 31 March 2021

क्या तुम्हें पता है विन्सेन्ट


क्या तुम्हें पता है विन्सेन्ट
किंवदंती बन गए हो तुम तो
फ़िल्मे बना रहे है लोग 
तुम्हारी जिंदगी पर
किताबें लिख रहे है
कविताएँ लिखी जाती है तुम पर
चित्रों का विषय बन रहे हो तुम
तुम्हारी चित्रों का विश्लेषण कर कर
तुम्हे जानने की कोशिशें चल रहीं हैं 
म्यूजियम में तुम्हारे चित्र देखने के लिए
क़तारें लग जाती है 
भावविभोर हो जाते है तुम्हारे चाहनेवाले
आँखे भर आती है 
जब रूबरू होते है तुम्हारी पेंटिंग्स के
कहना जो चाहा था तुम ने 
वो दृश्यसंगीत लोग सुन पा रहें है अब
जिन जिन जगहों को तुमने कैनवास पे रंग दिया
वहां जा कर रोमांचित हो जाते  है लोग
ब्रैंड बन गए हो तुम एक
पता है तुम्हे.. रंग बिक रहें है तुम्हारे नाम से 
महेंगे है लेकिन
तुम शायद ही खरीद पाते
कितनी जद्दोजहद की थी 
रंगों और कैनवास के लिए तुमने
सोचता हूँ, कि तुम कैसा महसूस करते
अगर तुम्हारे चित्रों की नीलामी की कीमतें सुनते
चेहरे पर शायद हल्की सी व्यंग्य भरी मुस्कान आ भी जाती
वो दिल चिरने वाली उदास आँखे 
चमक उठती एक पल के लिए
और अगले ही पल अपना इज़ेल कैनवास रंग ब्रश उठा 
तुम चमचमाती धूप के तलाश में निकल पड़ते
तुम्हारे आंखों से रिसता दर्द 
उदास कर देता है 
जब भी तुम्हारे सेल्फ पोर्ट्रेट्स सामने आ जाते है
पढा है मैंने,
पागलपन की हद तक तुम्हारे 
पीली धूप के लिए भटकने के बारे में
और फिर उसे रंगों मे मिलाकर 
बेतहाशा कैनवास पे बिछा देना 
चित्रों में महसूस किया है...
और पढा है
तुम्हारे गहरे अवसाद की अवस्था के बारे में
तुम्हारे एकाकीपन, बेचैनी के बारे मे
उपेक्षा से आहत तुम्हारे मन को
जान सकता हूँ
खबरें आती है
तुम्हारे चित्रों के रेकॉर्ड कीमतों में बिकने की या 
किसी नए फ़िल्म की तुम्हारी जीवनी पे बन रही
कमरे में टंगे तुम्हारे सेल्फ पोर्ट्रेट की तरफ नजर जाती है
तुम्हारी आंखों से रिसता दर्द उदास कर देता है

©अन्वर हुसेन2020

#जनमदिन_मुबारक_विन्सेन्टवैनगोग #30मार्च
#almirah_2007 #soloshow 

स्केच बुक

कॉलेजमध्ये असताना स्केचबुक असायचं जवळ. त्यात स्केचेस करायचो कधी कधी. शिक्षकांनी सांगितलेलं असायचं, उद्या येताना दहा स्केचेस पाहिजेत. मग कॉले...