*अंधार उजळून टाकणारे दिवे*
शाळेला सुट्या लागल्या की कधी एकदा गावाकडे, बुधगांवला जाऊ अस वाटत रहायचं. उन्हाळ्याच्या सुटीची वेगळी मजा असायची आणि दिवाळीच्या सुट्टीची वेगळीच मजा असायची.कधीतरी दूसरी तिसरीत असताना बुधगाव सोडून इस्लामपूरला रहायला आलो आम्ही. वडीलांच्या नोकरीच्या ठिकाणी. बुधगावात मन रमवायला खुप काही होतं. मित्र होते, आवडत्या जागा होत्या, राजवाडा, झाडं, आजी आजोबा, 'ते' घर, त्याच्या अंगणातलं पेरूचंझाड...दिवाळीच्या सुट्टीत खास आकर्षण म्हणजे दिवाळीचे ते 4 -5 दिवस. पण आधी आठवडाभर लगभग चालू व्हायची ती म्हणजे किल्ला करण्याची. घराच्या अंगणात किल्ला करायचो मी. गावातले मित्र यायचे मदतीला. किल्ल्यासाठी दगड माती विटाअसं सगळं कुठून कुठून गोळा करून आणायचो. राजवाड्याच्या भिंतीलगत रस्त्याकडेला बरेचसे दगड सापडायचे तिथून दगड उचलून आणायचो. मातीसाठी मात्र एकखास ठिकाण होतं. आणि ती मातीही खासचं असायची. गावातली सगळी पोरं किल्ला करण्यासाठी तीच माती वापरायचे. दिवाळी आधी किल्ला करण्याची लगभग सुरू झाली की गावातली बहुतेक पोरं पोती घेवून, सायकली घेवून गावाबाहेर कवलापूर रस्त्यावर असलेल्या इदगाह मैदानाच्या दिशेन जाताना दिसायची. गावाबाहेर जाणाऱ्या रस्त्याच्या डावीउजविकडच्या संस्थान कालीन सुंदर दगडी इमारती बघत, मजेत दोन्ही बाजूला असणाऱ्या वड चिंचेच्या डेरेदार झाडांच्या सावलीतून जाताना खूप आनंद वाटायचा. इदगाच्या जवळ मोठी मोकळी जागा होती. तिथलं वैषिष्ट्य म्हणजे तिथली माती मस्त लाल रंगाची होती. त्या मातीचं सगळया पोरांना आकर्षण होतं. गावातल्या सगळ्या पोरांचे किल्ले लाल मातीचेच दिसायचे. त्या मोकळ्या जागेत माती होती त्यात पण लाल रंगाच्या वेगवेगळ्या छटा दिसायच्या, पण सगळ्या पोरांना अगदी रसरशीत लाल रंग जिथं दिसायचा त्या ठिकाणचीच माती घ्यायची असायची. त्यामुळे गल्लीगल्लीतल्या प्रत्येक पोरांच्या टोळीची घाई चाललेली असायची तिथून माती काढायला. माती काढण्यासाठी प्रत्येकजण मिळेल ते हत्यार घेवून आलेला असायचा. स्क्रूड्रायव्हर, खुरपं, कुणी टिकाव घेवून यायचं. काढलेली माती पोत्यात भरायची , ते पोतं सायकलच्या मधल्या त्रिकोणी भागात व्यवस्थित ठेवायचं. माती काढून झाली की शेजारी इदगाह होता त्याला लागूनच कब्रस्तान होतं तिथं बोरिंग होतं तिथं पाणी हापसून हाथ पाय धुवायचे. तिथं कब्रस्तानाच्या आवारात एक प्रचंड मोठं पिंपळाचं झाड जे अजूनही आहे, ते झाड खुप आवडायचं. इदगाह मैदानातली ती पांढरी भिंत जिथं इदला वडील आजोबा आणी घरातल्या इतरांबरोबर नमाज पढायला जायचो. गावाबाहेरच्या माळावरच्या त्या पांढऱ्या भिंतीबद्दल काहीतरी कुतूहल मनात नेहमी वाटत रहायचं त्या वेळी .विशेषतः त्या भिंतीच्या दोन्ही कडेला असलेल्या त्या जराशा उंच गोल दगडी मिनारांबद्दलच कुतूहल खूप होतं. वर्षातून दोनदाच तिथं माणसं दिसायची. इतर वेळी सुनसान असायच. दिवाळीत माती आणायला गेलो की माती काढता काढता मधेमधे तिकडं लक्ष जात रहायचं, ती पांढरी भिंत आणी समोरचा तो चबुतरा एकाकी असल्यासारखे दिसायचे..माती काढून झाली की मग ती घेवून घराकडे परत फिरायचं. दगड विटा रचून मनाप्रमाणे किल्ला बांधून तयार असायचा, आणलेली माती आता त्या किल्ल्यावर थापायची. त्यासाठी मग त्या मातीचा चिखल करायचा. पाहिजे त्या प्रकारचा. आणी किल्ला आणि त्याच्या आसपासचा परिसर लिंपून घ्यायचा. हे सगळं होत जाईल तसा किल्ल्याचा नूर पालटून जायचा लाल रंगाच्या मातीत किल्ल्याचं सौदर्य वेगळच वाटू लागायचं. किल्ल्याचे बुरुज, वाघासाठी गुहा , महाराजांसाठी खास तयार केलेली जागा किल्ल्याच्या खालचं गाव ,शेतं, विहीर हे सगळं करताना किती रमून जायचो,दिवसच्या दिवस अक्षरशः....सोबतीला गावातले मित्र असायचे रमेश, शब्बीर आणी कोण कोण...किल्ला झाला कि त्यावर मोहरी टाकायची. दोन चार दिवसात ती उगवून यायची ही हिरवी गार कोवळे अंकुर किल्ला जीवंत करून टाकायचे एकदम. गावातल्या एका दुकानात किल्ल्यावरची चित्रं मिळायची. दरवर्षी तिथून दोनचार नवीन मावळे घेवून यायचो. घरातल्या एक पत्राच्या चौकोनी डब्यात किल्ल्यावरची चित्रं जपून ठेवली होती आज्जीने. किल्ला तयार झाला की तो डबा फळीवरून काढायचा. दिवाळीला फटाक्यांपेक्षा किल्ला या गोष्टीचं खूप आकर्षण होतं. दिवाळीच्या आदल्या दिवशी वडील सांगलीहून येताना फटाके घेवून यायचे. ते घेवून मग दिवाळीच्या दिवशी मित्रांसोबत फटाके उडवत फिरायचो. किल्लाच्या लगबगी सोबतच घरात आई आज्जीची वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवण्याची लगबगही चालू झालेली असायची. चकल्याचिवडालाडूशेव सगळं घरात तयार व्हायचं. बेसनचे लाडू तर खूप खास असायचे, त्याची सगळी तयारी आजोबा स्वतः करून द्यायचे. बेसन किती प्रमाणात भाजून घ्यायचं, कसा रंग आला की थांबायचे, तुप किती प्रमाणात घालायचं सगळ स्वतः करायचे. माझ्या आईला त्यांनी लाडू करायला शिकवले. तिच्याही हातच्या लाडवाला अप्रतीम चव आहे. आजोबांच्या हातच्या लाडवा सारखीच. दिवाळीत आणखी एक गोष्ट खूप लहाणपणापासून घरात बघत आलोय ती म्हणजे दिवाळी अंक. मौज, हंस, आवाज असे अंक वडील आणायचे. प्राथमिक शाळेत असण्याचा तो काळ तेव्हा वाचायचा फार काही नाद नव्हता. पण त्या दिवाळी अंकामधली चित्रं मात्र बघत रहायचो. मुखपृष्ठावरची चित्रं, आतमध्ये बारीक काळ्या रेषांनी काढलेली चित्रं खूप गुंगवून टाकायची. खूप आवडायची. ते दिवाळी अंक गावाकडच्या घरात कित्येक वर्षे जपून ठेवले होते एका कपाटात. दर सुट्टीत गेलो की दुपारच्या वेळी तो गठ्ठा काढून त्यातली ती चित्रं बघत रहायचो.पुढं चित्रकलेकडे वळलो, चित्रकारांबद्दल माहिती होवू लागली, चित्र बघण्यात येवू लागली अनेकांची, तेव्हा कळलं लहानपणी जी रेखा चित्रं दिवाळी अंकांतून बघत रहायचो ती बाळ ठाकूर, सुभाष अवचट अशा चित्रकारांची होती.आज जेंव्हा मी स्वतःच माझ्या चित्राबद्दल विचार करत राहतो तर मला लहाणपणी दिवाळी अंकामधून पाहिलेली ती चित्रं त्या सुंदर रेषा यांचा प्रभाव जाणवत राहतो. दिवाळीच्या दिवसांमधला अजून एक खूपच आवडणारा प्रकार म्हणजे सर्वत्र उजळलेले दिवे. गावभर सर्व घराघरांमध्ये पणत्या त्यांचा तो पिवळसर उष्ण प्रकाश, अंधार उळजवून टाकणारा... मनालाही उजळवून टाकतो. दिवाळीच्या दिवसात घरभर,अंगणात, फाटकापाशी, पायऱ्यांवर सर्वत्र दिवे लावायला आणी तो प्रकाश डोळ्यांत, मनात भरून घ्यायला खूप आनंद होतो. तोच प्रकाश मग माझ्या दिवाळीच्या चित्रांमध्येही उजळत राहतो. आता किल्ला , त्यासाठी माती दगड गोळा करणे फटाके उडवणे हे मागं पडून गेलंय, आता माझ्या साठी दिवाळीचे दिवस म्हणजे अंधार उजळवून टाकणारे दिवे, मनाला नवी उर्मी देणारे दिवे, आनंद, उत्साह पसरवणारा प्रकाशाचा सण...
(31 ऑक्टोबर 2021
दैनिक सामना
उत्सव, दिवाळी विशेष)
No comments:
Post a Comment