कॉलेजमध्ये असताना स्केचबुक असायचं जवळ. त्यात स्केचेस करायचो कधी कधी. शिक्षकांनी सांगितलेलं असायचं, उद्या येताना दहा स्केचेस पाहिजेत. मग कॉलेज सुटल्यावर बस स्टॉपवर नाहीतर टपरीवर बसायचं. स्केचेस कधी व्हायची, कधी नाही. वर्गात कम्पोजिशन द्यायचे सर, विषय वगैरे... तीन रफ स्केच करायचीच. त्यातलं एक फायनल. हा प्रकार कधी जमायचा नाही. दाखवण्यापुरतं मग काहीतरी करायचो. सरळ कॅनव्हासवर मनात येत जाईल तसं काम करत रहायचो. स्केचबुकातलं स्केच आणि कॅनव्हासवरचं चित्र यांचा दूरवर काही संबंध नसायचा. आर्ट स्कुल मधल्या एकुणच काळात स्केचबुक बरोबर असचं थोडसं अंतरावरचंच नातं होत. पुढं तिथुन बाहेर पडल्यावर मधला काळ एकंदरीत अस्पष्ट, गोंधळाचा संभ्रमित काळ होता, तसा तो अजुनही मधेअधे येतोच. सतत काही शोधत रहायचो. खूपच अस्वस्थ काळ. हे करून बघू ते करून बघू... एकाच वेळी अनेक दिशांनी ठेचकाळत प्रवास..व्यक्त होण्यातल्या मर्यादा..मनातली भिती. हे सगळं कुणाला सांगावं.. कॅनव्हास समोर जावं, तर तो दडपून टाकायला बघायचा सगळं. त्याच्या शुभ्रपणा समोर पुन्हा घुसमट. खुप वैयक्तिक स्वतःपुरतं काही तरी पाहिजे होतं. स्केचबुक ची आठवण आली मग. छोट्या आकाराची ती पिवळसर पानं जवळची वाटू लागली. त्यात मग वाट्टेल ते करत राहिलो, मनात येईल तसं. सतत सोबत असावं ते स्केचबुक असं वाटू लागलं. आर्ट स्कुल मध्ये असताना स्केचबुकशी असलेलं मेकॅनिकल नातं पार बदलून गेलं. स्केचबुक हे निव्वळ रफ स्केच करण्याचं ठिकाण न राहता खूप जवळची गोष्ट बनून गेलीय आता. त्यात व्यक्त होतो माझ्यातला संभ्रम, गोंधळ, कुतूहल, असंख्य चुका, अचानकपणे गवसलेले काही आकार, रेषांसोबत केलेले मनसोक्त खेळ, त्यातल्या शक्यता, स्केचबुकच्या पानांमधूनच सापडलेला मुंबई डायरीच्या चित्रांसाठीचा फॉर्म..असंख्य नोंदी निसर्गाच्या, माणसांच्या, शहरांच्या, गावांच्या, रस्त्यांच्या कशाकशाच्या....
तर माझ्यासाठी स्केचबुक हे असं काहीतरी आहे. व्यक्त होण्यासाठीचं स्वतंत्र ठिकाण. त्याचं असं अस्तित्व असलेलं. मला स्केचबुक आणि माझी चित्रं हे समांतर पणे जात असताना दिसतात, कधी एकमेकांचं प्रतिबिंब एकमेकात पडलेलं जाणवतं.
©अन्वर हुसेन मार्च 2022
No comments:
Post a Comment