रिक्षावाला
गावाकडच्या घरात एक रिक्षावाला भाडेकरू रहायचा. त्याची कधीकधी आठवण येते. आता तो एक साधासुधा रिक्षा चालवणारा माणूस तर त्याची आठवण कुणी का ठेवावी आणि इतक्या 35-40 वर्षांनंतर ही तो का आठवावा. तर त्याला कारणही तसंच आहे. अगदी लहान होतो. शाळेतही जात नव्हतो अजून. तो रिक्षावाला आणि त्याची बायको दोघेचं त्या गावाकडच्या घरातल्या एका खोलीत रहायला आले. तो दिवसभर सांगलीत रिक्षा चालवायचा. संध्याकाळी परतायचा. त्याची रिक्षा घराच्या अंगणात लावलेली असायची. त्या रिक्षाचं आकर्षण वाटू लागलेलं. ड्रायव्हिंग सीट वर बसून उगीच चालवायची ऍक्टिंग करायला मजा यायची . खेळायला एक नवी चीज मिळाली होती. तो माणूस पण भारी होता. एखादं दिवशी कामावरून लवकर यायचा घरी परत. त्या दिवशी बायकोला घेऊन कुठंतरी बाहेर जायचा. रात्री उशिरा यायचा. एक दिवस असाच लवकर आलेला होता, त्या दिवशी घरात आजी आणि आई ची ही कुठं बाहेर जाण्याची तयारी चाललेली होती आणि अर्थातच मी पण त्यांच्या सोबत जाणारच होतो. सांगलीला जायचं असं काहीतरी चाललेलं. आणि जायचं होतं ते त्या रिक्षावाल्याच्या रिक्षातून. ते कळल्यावर खूप आनंद वाटलेला. दुपारीच निघालो. मुळात कधीतरी क्वचित कधीतरी अशा मोठया शहरात जायला मिळायचं. त्याच आकर्षण होतं. तर त्या दिवशी आम्ही मिरजेला गेलो. कुठला तरी हिंदी सिनेमा बघायला गेलेलो. बहुतेक क्रांती सिनेमा होता तो असं पुसट आठवतय. त्या नंतर मिरजेच्या उरसात फिरलेलो. आईने आजीने तिथून काही भांडी विकत घेतलेली. काही खेळणीही घेयलेली. दर्ग्यात गेलो होतो. त्या नंतर परत यायला निघालो अंधार पडला होता आता. शहरातल्या रस्त्यावरच्या लाईट्स ,दुकानातल्या लाईट्स सगळीकडे चकचकाट बघून वाटलेलं आश्चर्य अजूनही मनात ताजं आहे. अगदी लहानश्या गावातून बाहेर पडून पहिल्यांदाच अशी शहरी रात्र अनुभवत होतो. रस्त्यावर काही थिएटर दिसली जिथे पोस्टर्स लावलेली दिसली त्यांच्यावरचे बल्ब च्या उजेडात उजळलेले चेहरे मात्र ओळखीचे वाटत होते. पेपर, मासिकं आणि घराशेजारच्या तंबू मध्ये सिनेमे लागले की त्यांची पोस्टर्स तंबू च्या बाहेर तिकिटासाठी पत्र्याचं केबिन केलेलं त्याच्या वर लावलेलं असायचं. दुसरं पोस्टर एसटी स्टँड वर. त्यावर बघून बघून ते चेहरे ओळखीचे झाले होते. त्या तंबूमध्ये ही खूप सिनेमे बघितले. बहुतेक बच्चन चे असायचे. तंबूत रात्री सिनेमा चालू झाला की अगदी घरात ऐकू यायचं. गाणी तर व्यवस्थित ऐकू यायची. नंतर तो रिक्षावाला अनेकदा त्या दोघांबरोबर मलाही सांगलीला घेऊन जाऊ लागला. सांगलीत त्याचे कोणी मेहमान रहायचे. तिथं जायचो. थोडा वेळ थांबून, काही वेळा जेवण करून परत यायचो. मला त्याचा सोबत शहरात जायला आवडायचं. रिक्षामधून संध्याकाळ, रात्रीच ते शहर ती दुकानं गजबजलेले रस्ते वाहनं सिनेमांची पोस्टर्स जाहिराती शहरातल्या दिव्यांची रोषणाई बघत जायला यायला खुप मजा यायची. त्या पुढे त्या रिक्षावाल्याच्या बायकोला मूल झालं. त्या मुलाचं बारसं त्यांनी त्यांच्या जवळच असलेल्या गावाकडे केलेलं. त्यासाठी मी आजी आणि माझा चाचा त्या गावात मुक्कामाला जाणाऱ्या एसटीने संध्याकाळी गेलो होतो. घर पाहुण्यांनी भरलेलं. संध्याकाळी त्या रिक्षावाल्यानं रेकॉर्ड प्लेअर वर हिंदी गाणी लावलेली कुरबानी, डॉन ,क्रांती असल्या काय काय सिनेमातली गाणी. रात्री गावातली लाईट गेलेली मग..घरभर अंधार. तशात त्या बाळाचं नाव ठेवायचा कार्यक्रम..चिमणी कंदिलाच्या उजेडात जेवणं..उशिरा रात्री लोकांच्या गप्पा ऐकत कधी झोप लागली कळलं नाही. सकाळी मग मुक्कामाच्या त्या एसटीने परत घरी. पुढे काही दिवसानी तो आमच्या घरातली खोली सोडून गेला. आम्हीही वडिलांच्या नोकरीच्या गावात रहायला आलो. रिक्षावाला कुठं असेल काय माहीत आता...
©अन्वर हुसेन/8 जानेवारी21
No comments:
Post a Comment