रस्ता
हा काय फक्त
कुठून तरी कुठं पर्यंत
जाण्या-येण्या साठीच असतो का
असेलही...
पण त्या चित्रकाराला आणखी पलीकडे घेऊन जातो....
दाखवतो,
दृष्यं
अमर्याद...
दृष्यं
नजर पोहोचत नाही तिथपर्यंत दृष्यं..
दिसणारी..
दिसता दिसता विरून जाणारी...
जवळची लांबची आणखी जवळची...
गजबजलेल्या रस्त्यावरची गजबजलेली दृष्यं...
गजबजलेल्या रस्त्यावरची उदास दृष्यं...
उदास.. एकाकी ..रस्त्यावरची हुरहुर लावणारी दृष्यं...
ऐन चौकात भर गर्दीत
कुणाच्यातरी चेहऱ्यावर उमटलेल्या
प्रश्नचिन्हाच दृष्य
त्या चेहऱ्यामागे त्याचवेळी दिसणाऱ्या शहरातल्या पुतळ्याचं दृष्य...
त्या पुतळ्याला वेढलेल्या किरकोळ वस्तू विकणारांच्या पथाऱ्यांची दृश्यं..
शहरात राबराब राबून
बुडत्या दिवसासारखं विझून
धीम्या गतीनं सायकली चालवत
घरी परतणाऱ्या
कामगारांच दृष्य...
गावाबाहेरच्या रस्त्यावरून
दिसणारं
दिवेलागण झालेलं ..
कातरवेळचं निस्तब्ध गाव...
माळावरून त्या दिव्यांच्या दिशेनं
जाणाऱ्या पायवाटेच दृष्य...
त्याच कातरवेळी
शहराकडे जाणाऱ्या
त्या वाटेवरून
एकट्या घराकडे
येताना दिसणार्या
त्या रिक्षा चं दृष्य...
त्या रिक्षातून 'कुणीतरी' येतानाचं दृष्य...
रस्त्या रस्त्यांवरच्या
टपर्यांमधल्या
स्टोव्हवरच्या केटल्यांची दृष्यं..
त्यात उकळणाऱ्या चहाच्या वाफेची दृष्यं...
कटिंग चहा पित रंगलेल्या गप्पांची दृष्यं...
हायवे वरच्या अण्णाच्या टपरितल्या टेबलावरचं दृष्य...
त्यावर त्यानं मांडलेलं त्याच रोजचं 'लाईफ',
चित्रकारासाठी 'स्टील लाईफ' ...
स्टुडिओतल्या नाटकी 'अरेंज्ड'
दृश्यांपेक्षा खरं दृष्य....
आडमार्गाच्या गावात
स्टेशन पलीकडच्या रस्त्यावर
आठवडी बाजारात तळल्या जात असलेल्या कांदा भजी ,वड्यांच दृष्य...
ती भजी तळणाऱ्या त्या बाईचं दृष्य
तिच्या ठसठशीत चेहर्याचं, तिच्या नाकातल्या दिलखेच फुलीच दृष्य...
मंडईतल्या रिकाम्या आंब्यांच्या पेट्यांचं ,त्या एकमेकांवर अस्ताव्यस्त रचण्यायातून घडलेल्या इंस्टोलेशन चं दृश्य आणि
त्या मोकळया पसाऱ्यात बसून जगाची खबरबात वाचणार्याचं दृश्य...
दोस्ताच्या ग्यारेजमधल्या
ऑइलमाखल्या
मळकट टेबलावरच्या
कळकट तेलाच्या बुधल्या
ग्रीसचे डब्बे, ऑइल पंपाची दृष्यं..
ऑइल पंपाच्या थेट भिडणाऱ्या scarlet lake रंगाचं दृष्य....
मंदिराच्या रस्त्यावर
फुलांना ताजं ठेवायची धडपड दिवसभर करणाऱ्या
कोमेजल्या बायांच दृष्यं.. टपरीवरच्या टेबलावर अस्ताव्यस्त पसरलेल्या
वर्तमान पत्रांच ,
सिग्रेटी शिलगावून टाकलेल्या जळक्या माचीसच्या काड्यांच
आणि रिकाम्या चहाच्या पेल्यांच दृष्यं...
व्हिक्टोरियन एज मधल्या,
जुनाट खिडकीत बसलेल्या कबुतराचं ,
त्या खिड्कीच्या तडकलेल्या काचांमधून बाहेर पडू पाहणाऱ्या
वर्षानुवर्षे थबकलेल्या अंधाराच
दृष्य...
तो लाल टोपीवाला
चहाची केटली एका हातात
दुसऱ्या हातात ग्लास
परत परत दिसत राहतो
वेगवेगळ्या ठिकाणी चौकात दुकानात , बँकांत, बाजारात ...
सुट्टीच्या दिवशी सार्वजनिक वाचनालयात दिसतो..
सोबत एक मुलगा असतो...
लाल टोपीवाल्या त्या चहावाल्याचं
दृश्य
शाळेजवळच्या छोट्याश्या दुकानातल्या
चॉकलेट ,गोळ्या आणि बऱ्याच कसल्या कसल्या बरण्याचं नॉस्टॅल्जीक करणारं दृश्य...
रस्त्याकडेला उभ्या
पुराण्या जुन्या थकलेल्या
त्या ट्रकचं गूढ दृष्य
त्याच्याशी खेळणाऱ्या
कबुतरांच दृष्य...
रात्री शहरातल्या रस्त्यावर
दूरवरून दिसणारा
आम्लेट पाव च्या गाडीवर टांगलेल्या
गॅसबत्तीचा पिवळसर उबदार उजेड
त्याच्या सभोवती जमलेल्या माणसांच दृष्यं...
दृष्यं दृष्यं दृष्यं दृष्यं........
अमर्याद......
दृश्यांचा कोलाज....
तुकडे तुकडे जोडून बनलेला
हा रस्ता...
कधी एखाद्या तद्दन मसाला फिल्म सारखा वाटतो..
कधी आठवते ,एखादी ओळ ...
कुठल्यातरी विद्रोही कवीच्या कवितेतली
कधी , मॉनेटच्या चित्रांमध्ये शतकभरापासून थरथरणाऱ्या ऊन सावल्याची याद देणारे रस्ते....
कधी कुठल्या रस्त्यावर अचानक आठवते 'रे' च्या सिनेमातली एखादी फ्रेम..
आणि तो दोमिए...
तो तर पावलोपावली आठवतो
आठवतात त्याची मन पोखरणारी चित्रं...
अगणित
दृष्यांच्या मधोमध
लॉंगशॉटमिडशॉटक्लोजअप्सनी घेरलेला,
तो, चित्रकार
स्वतःतच हरवून जातो...
त्याला दिसत राहतात अनेक दृष्यं
त्या दृष्यांत सापडतात चित्र...
रस्त्यावरची चित्रं
रस्त्यावरच्या कहाण्या लपेटलेली
अन्वर हुसेन/2017
'रोड स्टोरीज...' ही चित्रमालिका एप्रिल 2017 मध्ये जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई इथे प्रदर्शित झाली होती.
नंतर ही मालिका आर्ट2डे गॅलरी पुणे इथे मार्च 2018 मध्ये प्रदर्शित झाली होती.
©अन्वर हुसेन 2017