Wednesday, 19 August 2020

खय्याम आणि रात्र...

खय्याम आणि रात्र....

पुण्याहून येत होतो परत, रात्री वेळानेच स्वारगेटवरून निघालो होतो. कात्रज घाट ओलांडून बस हायवेला लागली. खिडकीतून येणाऱ्या मस्त वाऱ्याने कधी झोप लागली कळलंच नाही. 
काहीतरी छान ऐकू येत होतं...
अर्धवट जाग असण्याच्या अवस्थेत..
खूप धुंद करणारं काहीतरी...मी कुठं आहे ,भवती काय आहे ..काही भान नव्हतंच..
ती सुरावट , तो आवाज मला अलगद घेऊन निघाला होता त्याच्या मागोमाग... हम भटकते हैं, क्यों भटकते हैं, दश्तो-सेहरा मे.....  झोपेचा अंमल कमी होऊन मी त्या खिडकीतून येणाऱ्या गाण्याच्या पूर्ण अंमलाखाली गेलेलो..मध्यरात्रीच्या त्या वेळेला त्या थंड हवेसोबत येणाऱ्या त्या संतूर व्हॉयोलिन च्या सुरांनी माझ्या पूर्ण मन मेंदूचा ताबा घेतला होता..आणि भरीला लता चा आवाज...गाण्यातला तो विलक्षण ठहराव मला दूर कुठल्यातरी प्रदेशात घेऊन गेलेला....
ऐसा लगता है, मौज प्यासी है, अपने दरिया में...
कैसी उलझन है, क्यों ये उलझन है...
एक साया सा, रू-ब-रू क्या है...
तो प्रदेश खूप वेगळा होता. संतूर चे ते सुंदर पिसेस मला त्यातले रंग दाखवत होते. व्हॉयोलिन चे पिसेस मला तिथली गहराई दाखवत होते..आणि तो आवाज मनातल्या कुठल्याशा अनाम दुःखाला वाट करून देत होता...
तो येणारा आवाज थांबला. मी अजूनही त्याच धुंद अवस्थेत...नको वाटत होतं त्या अवस्थेतून बाहेर यायला..
पण हळूहळू भान येऊ लागलं..बस कुठे तरी थांबलेली होती. हायवे कडेच्या धाब्यावर..प्रवासी उतरले होते बरेचसे जेवणा साठी, बस मध्ये तुरळक लोक होते, तेही झोपलेले. शेजारी एक ट्रक उभा होता, त्यात टेप वाजत होता.. मध्य रात्री अर्धवट जागेपणी ती विलक्षण अनुभूती होती...

खय्याम च्या गाण्यांची प्लेलिस्ट रात्र सुसह्य करतेय गेली अनेक वर्षे.....

मनाला शांत करणारा कलावंत..
खूप आनंद देणारा कलावंत...

आज त्यांचा स्मृती दिन..
आपल्या अटींवर, आपल्याच धुंदीत जगलेला संगीतकार...

अन्वर हुसेन/19 ऑगस्ट 19©अन्वरहुसेन 2020

Monday, 3 August 2020

रोड स्टोरीज

रस्ता
हा काय फक्त
कुठून तरी कुठं पर्यंत
जाण्या-येण्या साठीच असतो का
असेलही...
पण त्या चित्रकाराला आणखी पलीकडे घेऊन जातो....
दाखवतो,
दृष्यं
अमर्याद...
दृष्यं
नजर पोहोचत नाही तिथपर्यंत दृष्यं..
दिसणारी..
दिसता दिसता विरून जाणारी...
जवळची लांबची आणखी जवळची...
गजबजलेल्या रस्त्यावरची गजबजलेली दृष्यं...
गजबजलेल्या रस्त्यावरची  उदास दृष्यं...
उदास.. एकाकी ..रस्त्यावरची हुरहुर लावणारी दृष्यं...
ऐन चौकात भर गर्दीत
कुणाच्यातरी चेहऱ्यावर उमटलेल्या
प्रश्नचिन्हाच दृष्य
त्या चेहऱ्यामागे त्याचवेळी दिसणाऱ्या शहरातल्या पुतळ्याचं दृष्य...
त्या पुतळ्याला वेढलेल्या किरकोळ वस्तू विकणारांच्या पथाऱ्यांची दृश्यं..
शहरात राबराब राबून
बुडत्या दिवसासारखं विझून
धीम्या गतीनं सायकली चालवत 
घरी परतणाऱ्या
कामगारांच दृष्य...
गावाबाहेरच्या रस्त्यावरून
दिसणारं
दिवेलागण झालेलं ..
कातरवेळचं निस्तब्ध गाव...
माळावरून त्या दिव्यांच्या दिशेनं
जाणाऱ्या पायवाटेच  दृष्य...
त्याच कातरवेळी
शहराकडे जाणाऱ्या
त्या वाटेवरून
एकट्या घराकडे
येताना दिसणार्या
त्या रिक्षा चं दृष्य...
त्या रिक्षातून 'कुणीतरी' येतानाचं दृष्य...
रस्त्या रस्त्यांवरच्या
टपर्यांमधल्या
स्टोव्हवरच्या केटल्यांची दृष्यं..
त्यात उकळणाऱ्या चहाच्या वाफेची दृष्यं...
कटिंग चहा पित रंगलेल्या गप्पांची दृष्यं...
हायवे वरच्या  अण्णाच्या टपरितल्या टेबलावरचं  दृष्य... 
त्यावर त्यानं मांडलेलं त्याच रोजचं 'लाईफ', 
चित्रकारासाठी  'स्टील लाईफ' ...
स्टुडिओतल्या नाटकी 'अरेंज्ड' 
दृश्यांपेक्षा खरं दृष्य....
आडमार्गाच्या गावात 
स्टेशन पलीकडच्या रस्त्यावर
आठवडी बाजारात तळल्या जात असलेल्या कांदा भजी ,वड्यांच दृष्य...
ती भजी तळणाऱ्या त्या बाईचं दृष्य
तिच्या ठसठशीत चेहर्याचं, तिच्या नाकातल्या दिलखेच फुलीच दृष्य...
मंडईतल्या रिकाम्या आंब्यांच्या पेट्यांचं ,त्या एकमेकांवर अस्ताव्यस्त रचण्यायातून घडलेल्या इंस्टोलेशन चं दृश्य आणि
त्या मोकळया पसाऱ्यात बसून जगाची खबरबात वाचणार्याचं दृश्य...
दोस्ताच्या ग्यारेजमधल्या 
ऑइलमाखल्या
मळकट टेबलावरच्या
कळकट तेलाच्या बुधल्या
ग्रीसचे डब्बे, ऑइल पंपाची दृष्यं..
ऑइल पंपाच्या  थेट भिडणाऱ्या scarlet lake रंगाचं दृष्य....
मंदिराच्या रस्त्यावर 
फुलांना ताजं ठेवायची धडपड दिवसभर करणाऱ्या
कोमेजल्या बायांच दृष्यं.. टपरीवरच्या टेबलावर अस्ताव्यस्त पसरलेल्या 
वर्तमान पत्रांच , 
सिग्रेटी शिलगावून टाकलेल्या जळक्या माचीसच्या काड्यांच
आणि रिकाम्या चहाच्या पेल्यांच दृष्यं...
व्हिक्टोरियन एज मधल्या,
जुनाट खिडकीत बसलेल्या कबुतराचं ,
त्या खिड्कीच्या तडकलेल्या काचांमधून बाहेर पडू पाहणाऱ्या
वर्षानुवर्षे थबकलेल्या अंधाराच 
दृष्य...
तो लाल टोपीवाला
चहाची केटली एका हातात
दुसऱ्या हातात ग्लास
परत परत दिसत राहतो
वेगवेगळ्या ठिकाणी चौकात दुकानात , बँकांत, बाजारात ...
सुट्टीच्या दिवशी सार्वजनिक वाचनालयात  दिसतो..
सोबत एक मुलगा असतो...
लाल टोपीवाल्या त्या चहावाल्याचं
दृश्य
शाळेजवळच्या छोट्याश्या दुकानातल्या
चॉकलेट ,गोळ्या आणि बऱ्याच कसल्या कसल्या बरण्याचं नॉस्टॅल्जीक करणारं दृश्य...
रस्त्याकडेला उभ्या
पुराण्या जुन्या थकलेल्या
त्या ट्रकचं गूढ दृष्य
त्याच्याशी खेळणाऱ्या 
कबुतरांच दृष्य...
रात्री शहरातल्या  रस्त्यावर 
दूरवरून दिसणारा
आम्लेट पाव च्या गाडीवर टांगलेल्या
गॅसबत्तीचा पिवळसर उबदार उजेड
त्याच्या सभोवती जमलेल्या  माणसांच दृष्यं...
दृष्यं दृष्यं दृष्यं दृष्यं........
अमर्याद......
दृश्यांचा कोलाज....
तुकडे तुकडे जोडून बनलेला
हा रस्ता...
कधी एखाद्या तद्दन मसाला फिल्म सारखा वाटतो..
कधी आठवते ,एखादी ओळ ...
कुठल्यातरी विद्रोही कवीच्या कवितेतली
कधी , मॉनेटच्या चित्रांमध्ये शतकभरापासून  थरथरणाऱ्या ऊन सावल्याची याद देणारे रस्ते....
कधी कुठल्या रस्त्यावर अचानक आठवते 'रे' च्या सिनेमातली एखादी फ्रेम..
आणि तो दोमिए...
तो तर पावलोपावली आठवतो
आठवतात त्याची मन पोखरणारी चित्रं...
अगणित 
दृष्यांच्या मधोमध
लॉंगशॉटमिडशॉटक्लोजअप्सनी घेरलेला,
तो, चित्रकार
स्वतःतच  हरवून  जातो...
त्याला दिसत राहतात अनेक दृष्यं
त्या दृष्यांत सापडतात चित्र...
रस्त्यावरची चित्रं
रस्त्यावरच्या कहाण्या लपेटलेली

अन्वर हुसेन/2017
'रोड स्टोरीज...' ही चित्रमालिका एप्रिल 2017 मध्ये जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई  इथे प्रदर्शित झाली होती.
नंतर ही मालिका आर्ट2डे गॅलरी पुणे इथे मार्च 2018 मध्ये प्रदर्शित झाली होती. 

©अन्वर हुसेन 2017


Thursday, 30 July 2020

कंटाळा

हे ईजलवरचं पेंटिंग पूर्ण झालं की मी बाहेर पडणार आहे. किती दिवस झाले बाहेर पडलेलोच नाही. स्टुडिओत सगळीकडे चित्रं आणि स्केचेस बघावी तिकडे…गॅलरीला द्यायची कामं…
थोडा कंटाळा आल्यासारखा वाटतोय. रुटीन झाल्यासारखं…
चार भिंतीच्या आत…
थोडं भटकून यावं…
त्या रस्त्याने..
तो रस्ता, विस्तीर्ण माळ, ते स्तब्ध डोंगर…या सगळ्याची आठवण येतेय खूप. तो पळस फुलला असेल आता. त्या वळणावरचा.
रस्ता सोडून डोंगराकडे जाणाऱ्या त्या वाटेवरच्या झाडाखाली थांबून समोरचं लँडस्केप पुन्हा एकदा बघितलं पाहिजे.
स्केच बुक, रंग घेऊन जाऊ .वाटलं तर एखादं स्केच करू. झाडाचं..
बाहेर पडलो सकाळी लवकर…
हायवे ओलांडून त्या रस्त्याने पुढे जाता जाता कसं सगळं मुक्त झाल्यासारखं वाटायला लागतं. अमर्याद पसरलेल्या दृश्यांचा सच्चेपणा, ताजेपणा मन काबीज करतो. मनात चित्रं साठत राहतात. काही वेळा रहावत नाही… थांबावंच लागतं , मग ते दृश्य स्केच बुक मध्ये नाहीतर कॅनव्हास वर सोबत घ्यायचं..
असं दिवसेंदिवस भटकत राहतो…
कित्येकदा वाटत राहतं, असंच फिरत रहावं. दूरदूर ..गावं, निसर्ग,समुद्रकिनारे,लहान मोठे डोंगर, झाडं, माळरानं, पायवाटा, निळशार आकाश या सगळ्यांच्या मागे..सगळ बघत, मनात साठवत, पेन्सिल घेऊन सगळं स्केचबुकात रेखाटत सुटावं..मस्त पैकी त्या छोट्या टेकडीवर ईजल लावून ऑइल कलर्समधे पलिकडचा प्रदेश ब्रशच्या दिलखुलास फटकाऱ्यांमध्ये कॅनव्हास वर निवांत पणे उतरवत रहावं…
मनभरून...
सर्व प्रकारच्या व्यवहारापासून दूर दूर..


©अन्वर हुसेन2017

Wednesday, 29 July 2020

स्केचबुक मधली काही पानं #1

# 1

मंडई च्या परिसरामध्ये फिरतोय,
प्रचंड गर्दीने वेढलंय इमारतीला...
व्यापारी ,भाजी विक्रेते, भाजी खरेदी करणारे , फळविक्रेते , फळं विकत घेणारे, फेरीवाले,
उजव्या हाताला कुंकू,हळद,तोरणं, आणि हरतर्हेचे पूजेसाठी लागणारे साहित्य विकणारे...
5-5.30 ची वेळ.
मंडई च्या इमारती भोवती फिरत फिरत, आत कधी शिरलो माझं मलाच कळलं नाही .
इथं काही व्यापारी कांदे,बटाटे ,फळं भाज्या विकत आहेत. या मंडईतले पिढीजात व्यापारी ...
व्यापार करण्यात मग्न आहेत..
वर्दळ,गर्दी ...कोलाहल बाहेरच्या पेक्षा फारच कमी.
इमारतीचा आतला अवकाश low key कडे झुकलेला..
आणि एकंदरीत माहौल निवांत...
आंब्याचा सिझन नुकताच संपलाय.
रिकाम्या लाकडी पेट्यांचा ढीग अजूनही एक कोपऱ्यात पडून आहे.
जागा मिळेल तशा एकावर एक रचलेल्या रिकाम्या पेट्या..
त्या रचण्याचा एक छान form तयार झालाय...
त्या बाजूला वळलो...
एकजण, निवांतपणे पेपर वाचतोय..
एक हात पेटीवर टेकून , छान पोज . अवती भोवती रिकाम्या पेट्यांचे आकार ,
मला स्केच दिसलं ...
पटकन पेपर वाचून होण्याआधी  स्केच  करू...

# 2

मंडई च्या बाहेर ,
कमानी समोर ,
एका चाचांची वडा पाव ,भजी याची गाडी आहे.
भज्यांचा मस्त वास..

मला चित्र दिसतंय..

समोरची देखणी कमान ,

तेव्हढाच देखणा ग्रेस फुल वरचा टॉवर...
नजर फिरतेय...
डोक्यात कंपोझ होतंय चित्र...
हे आता स्केचबुकात उतरवावं लागेल..
समोर मस्त वडे , पण ते नंतर बघू
स्केचबुक काढलं...

चाचांची फिगर...त्यांचं एका लयीत चाललेलं काम..
ती टांगलेली गॅसबत्ती ..वा...
रात्री येऊन बघायला पाहिजे...
बत्तीच्या पिवळ्या उजेडात चाचांचं पोर्ट्रेट...
गाडीखाली कांद्याची मोठी पिशवी,पाण्याची बादली, गाडीवरचं नक्षीकाम....
मागं मंडई चा टॉवर ...
नजरेनं edit केलेलं समोरचं दृष्य स्केचबुक च्या पानावर उतरलं....
आता वडापाव ची चव बघू...

तो टॉवर खुणावतोय
पण अंधार पडतोय...

बत्तीच्या उजेडातलं पोर्ट्रेट बघू मग

उद्या पुन्हा येऊ इकडे, यावंच लागेल..

# 3

काल सापडलेल्या अँगल मधून ...
सकाळी सकाळी..
तो टॉवर ...
ब्रिटिश शैलीचं architecture असलेली इमारत
हा अष्टकोनी आकाराचा टॉवर
मस्त काळ्या दगडात केलेलं बांधकाम
छप्परावर वापरलेली कौलं...
प्रत्येक बाजूला असलेल्या उंच गॉथिक खिडक्या..
त्यावरच नेमकं नक्षीकाम,
दगडाला तरलपणा देणारं...
या सर्व गोष्टींचं एकमेकांशी असलेला बंध ,त्यांचं अचूक प्रमाण..
यातून निर्माण झालेली खुमारी ..
ती पकडता आली पाहिजे ...
मजा येईल....

# 4

अशा दगडी इमारती गुंगवून टाकतात,
त्यातलं मॅजिक कुठल्या कुठं फिरवून आणतं,
भवतालच्या भडक वर्तमानातून क्षणभर सुटका करतं..
टॉवरचं स्केच झाल्यावर उजव्या बाजूने थोडं पुढे आलो...
तिथं एक दृश्य स्केच व्हायची वाट पाहत थांबलेलं दिसलं ...
ते लोक अशा नजाकतदार इमारती उभ्या करून गेले,
त्याचे आपल्या लोकांनी आजकाल काय छळ चालवलेत हे पाहिलं कि त्यांच्या आणि आपल्या दृष्टीचा फरक जाणवतो.
समोर ची भव्य भिंत ...
Symmetrical रचनेतून , भिंत आणि कमानींच प्रमाण
...यातून साधलेला दृश्य अनुभव , वाह...
दोन जुळ्या डौलदार कमानी
मधल्या रेखीव गोल खांबावर
अलगद येऊन
एकमेकींना बिलगलेल्या..
जिथं त्या बिलगल्या तो क्षण
त्या दगडी खांबाने
अतिशय नाजूक पानाफुलांच्या वेलबुट्टी ने अगदी साजरा केलाय...
आपण मात्र या सगळ्याचा वापर कसा होईल ते बघतो फक्त...
आपापल्या गरजेप्रमाणे ..
कमानीच्या खांबांना ,खिडकीच्या गजांना दोऱ्या बांधून,
पिवळ्याधमक प्लास्टिकच्या ताडपत्र्या बांधल्या, डोळ्यात घुसणाऱ्या...
त्या भिंतीवर जागा मिळेल तिथे ,
आपापल्या वस्तूंच्या ,पदार्थांच्या ,दुकानांच्या आणि कशाचाही..
जाहिरातींचे बोर्ड  ठोकले, रंगवले, चिटकवले...
तारांच्या जंजाळात अडकवलं...
चित्रकारांचं एक बरं असतं, त्यांची नजर नेहमीच auto focus च्या mode  वर असते...
नेमक्या ठिकाणीच focus लागतो...
विक्रेत्यांची, ग्राहकांची, गाड्यांची गर्दी....
या सर्व गर्दी कोलाहलातूनही ते शिल्प तुकड्या तुकड्यातून मनाला भिडतंय ...
काही गोष्टी blur होऊन जातात
तर काही delete होतात..
त्यातून नेमकं तेच स्केचबुकात उतरतं....

अन्वर हुसेन


©अन्वर हुसेन 2016

पूर्वप्रकाशीत: डिजिटल पाडवा विशेषांक एप्रिल 2016

Tuesday, 28 July 2020

व्यंकटेश अंकलचं घर



"आऊटडोर ला जाऊया की कुठंतरी एक दिवस" अनुप चा मेसेज..बरेच दिवस चाललं होतं, कुठंतरी लँडस्केप करायला जायचं. नक्की होत नव्हतं. पण त्याचा मेसेज आल्यावर ठरवलं,जाऊयाच..तसा त्याला रिप्लाय दिला. सोमवारी जाऊया. कुठं जायचं काय नक्की नव्हतं. सांगलीतच कुठंतरी जाऊ अस ठरलं. पटकन आठवलं ते वानलेसवाडी. ठरलं. सकाळी आलो वानलेसवाडीत. ऊन प्रचंड. मिरज रोड ला अगदी लागूनच ही वाडी. खूप पूर्वी इथं विल्यम वानलेस चेस्ट हॉस्पिटल होतं. त्यावेळच्या पेशंट साठी असलेल्या छोट्या छोट्या अनेक कौलारू कॉटेजेस अजूनही आहेत. आता त्यात काही लोकं राहतात. मोठ्या परिसरभर अशी स्वतंत्र सुटी सुटी घरं विखुरली आहेत. काही मोठाली ब्रिटिश शैलीतली घरं ऐस पैस निवांत पणे बसून राहिल्या सारखी दिसतात. एखादं दुमजली घर लांब रुंद व्हरांडे असलेलं. खूप झाडं सगळीकडे. सध्या मात्र उन्हामुळे हिरवाई हरवलेले. त्यांच्या रेषांच्या जाळ्यातून दिसणारी ती घरं. त्या वाटा, पायवाटा.. ठिकठिकाणी चित्रंच ठेवल्या सारखी दिसतात. एकूणच वर्दळ कमी असल्यानं एक स्तब्धता सगळीकडे पसरून राहिलेली असते. फिरता फिरता एक मोकळ्या जागे जवळ आलो. काही मुलं क्रिकेट खेळत होती त्या मोकळ्या मैदानात. अशा उन्हात. कडेने ठराविक अंतरावर घरं होती. नजर फिरत होती. एका ठिकाणी थांबली. बसायला सावली ही होती एक झाडाची. तिथंच बसलो. कॅनव्हास ब्रश रंग प्यालेट काढून पेंटिंगला सुरुवात केली. मुलांचा खेळ ऐन भरात आलेला तिकडे. क्वचित कुणी तरी चालत किंवा बाईक वरून जाणारा येणारा. समोरच्या घराचं गेट मागचा पांढरा रंग कौलांचा रंग ब्रशच्या स्ट्रोक्स च रूप घेऊन कॅनव्हास वर उमटत होते. सावल्यां चे आकार बदलत होते. रंग बदलत होते. वाळलेल्या झुडुपांनी त्याच्या रेषांमधून एक टेक्श्चर त्या दृश्याला दिल होतं. आणि त्या पिवळसर, ब्राउनिश करड्या छटांनी त्या उन्हात त्या दृश्याभोवती तटस्थता निर्माण केली होती. मागे कुठेतरी नाजूकपणे काही आकार चैत पालवीची जाणीव करून देताना दिसत होते. लाकडी गेट बघून काहीतर आठवत राहिलं पुन्हा पुन्हा. त्या घरातला एक जण खूप वेळ त्या गेट च्या खांबाला टेकून फोन वर बोलत उभा राहिला होता. चित्र पूर्ण होईस्तोवर दोनदा तो फोनवर बोलत उभा राहिला गेट पाशी येऊन. मग त्यालाही चित्रात घ्यावं लागलं. मुलांचा खेळ थांबला होता. ती पलीकडच्या मोठ्या झाडांच्या सावलीत बसून राहिली होती. चित्र पूर्ण होत आलेलं. त्या मुलांचं माझ्याकडे लक्ष गेलं. त्यातली काहीजण आली जवळ. चित्र बघत ,चित्रातलं घर नेमकं कुठलं यावर बोलत राहिली. त्यांनी ओळखलं. अरे हे व्यंकटेश अंकल चं घर. आणि अंकल पण आहे चित्रात….
मला चित्रांचं टायटल मिळालं…
व्यंकटेश अंकल चं घर…..



©अन्वर हुसेन2019

Friday, 24 July 2020

आडमार्गावर भेटलेला कवी


रस्त्याच्या दोन्हीकडे लांबवर पसरलेलं लँडस्केप बघत निवांत निघालो होतो.रस्त्यावर जवळपास एकटाच दिसत होतो मी. वाहनं ही फार कमी येतजात होती. दूरवर एकजण रस्त्याकडेला उभा दिसत होता. मी पण त्या माणसाला दिसलो असेन त्याच्या दिशेनं येताना. त्यांनी हात केला, थांबण्यासाठी....तोवर मी त्यांच्या जवळ आलोच होतो. थांबलो. पुढे ढगेवाडी फाट्यापर्यंत सोडणार का? त्यांनी विचारलं. शक्यतो असं फिरताना मी कुणाला घेत नाही गाडीवर. एक तर मी रस्त्यात अनेक वेळा थांबत असतो.अनेक गोष्टी दिसत असतात. मग थांबून ते बघणं आलं. वाटलं तर स्केच करायचं असतं. फोटो काढायचे असतात. त्यामुळं मी त्यांना सरळ सांगतो, मी वाटेत बऱ्याचदा थांबत थांबत जाणार आहे. असं सांगितल्यावर विचारणारा म्हणतो ,मग जावा.... या आत्ता हात दाखवलेल्या व्यक्तीला पण मी तसंच सांगितलं. मला वाटलं मग जा तुम्ही असं म्हणेल.. ती व्यक्ती म्हणाली, असुदे की ...चालतंय..मला बी निवांतच जायाचं हाय...मनात म्हंटल, लोकांना लवकरात लवकर पोहोचायचं असतं कुठूनतरी कुठे. आणि यांना निवांत जायचं आहे. चांगलं आहे... म्हंटल चला...वयस्कर माणूस होता. पुढे निघालो . बोलणं सुरू झालं. हे सगळं चाललं होतं कापरी - येडंफाटा या रस्त्यावर. NH4 हायवेला जाऊन मिळतो हा रस्ता पुढे. फोटो काढायला मला थांबायचं असतं असं म्हंटल्यावर त्यांनी विचारलं, तुम्ही अल्बम बनवताय का? नाही..मी म्हणालो. त्यांना कसला अल्बम अपेक्षित होता काय माहीत....
कुठलं ? 
इकडं कुणीकडे निघालाय? 
त्यांनी असं विचारल्यावर मी पण विचारात पडलो; खरंच इकडं कुठं निघालोय मी. शिराळ्याकडे जाताना डाव्या हाताला हा फाटा दिसतो दरवेळी. लहानसा सिंगल रोड. मनात आलं आणि आज तो रस्ता पकडला आणि निघालो . कुठं जातो हे पण माहीत नव्हतं. त्यांना जास्त काय सांगत बसलो नाही. असंच निघालोय..एवढंच म्हणालो. 
त्यांना विचारलं, ढगेवाडी जवळच आहे का ?
होय म्हणाले. कुठून आलाय ? तर म्हणाले,  बिळाशीसनं ...चरण बिळाशी...ते 1930 चं...प्रसिद्ध ..बंड.. तिथंन...एक कार्यक्रम हाय पावण्याकडं तिकडं निघालोय.  येसटी चुकली...सगळं अगदी डिटेल मधे सांगितलं त्यांनी.
लाडेगाव 5 किलोमीटर असा बोर्ड मागे गेला. 
काय करता तुम्ही? काहीतरी विचारायचं म्हणून मी विचारलं. 
घरं बांधायची कामं घेतो.....
घरं बांधायची कामं म्हणजे नेमकं काय, याबद्दल त्यांना विचारणार इतक्यात...
डावीकडे रस्त्यालगत खूप झाडांची गर्दी दिसू लागली..वडाची झाडं.. जवळ आलो तर तो फारच वेगळा प्रकार दिसत होता. थांबलो. खूप जुन्या पुराण्या झाडाच्या पारंब्या फिरून जमिनीला मिळाल्या होत्या. खूपच वैशिष्ट्यपूर्ण गोलाकार रचना तयार झाली होती. चारी बाजूनी मोठाल्या पारंब्याची  गर्दी आणि मधे मोकळी जागा. मी सोबत आलेल्याना म्हणालो , मी थांबणार आहे थोडा वेळ, तुम्हाला दुसरं कोणी भेटलं तर तुम्ही जा त्याच्या सोबत. तर म्हणाले, असुदे ..मी पण बघतो जरा ...तवर तुम्ही काढा फोटो..मग मी बघत राहिलो. चारी बाजूनी  जमिनीत शिरलेल्या मोठाल्या पारंब्या ,त्यामुळे तयार झालेला अफलातून अवकाश...वेगळ्या जगात प्रवेश केल्यासारखं वाटलं. आणि मग अर्थातच तिथं माणसांनी अनेक आकारांचे शेंदूर फासलेले दगड ,झाडाला लहानमोठ्या घंटा ,झेंडे, तसबिरी, अमुक तमुक....हे सगळं पद्धतशीर मांडलेलंही आहे. एक बाई तर तिथं  त्या 'देवा' बरोबर काही तरी बोलतही होती. दुसरं कुणी नव्हतं. आमची चाहूल लागल्यावर ती पलीकडे असलेल्या दुसऱ्या देवाकडे गेली. थोड्या वेळात बघायचं ते बघून, फोटो काढून पुढच्या बाजूला आलो. सोबतचे  शांतपणे वाट पहात थांबले होते. कशासाठी काढताय फोटो ,सिनेमासाठी? त्यांचं माझ्याकडे सतत लक्ष होतं. खूप उत्सुकता लागलेली दिसली त्यांना...
चित्रं काढत असतो मी ,त्यासाठी उपयोग होतो ...मी म्हणालो. चित्र काढतोय हे ऐकल्यावर लगेच ते म्हणाले, हां...तरंच एव्हढं बघत फिरताय. माझा एक दोस्त हाय गावातला, त्यो बी ड्रॉइंग काढतोय. मुंबईला असतोय. जे जे स्कुल ला शिकवतोय...
अरे... जे जे स्कुल वगैरे.... मी लक्षपूर्वक ऐकू लागलो त्यांचं बोलणं.  जे जे  वगैरे या माणसाला माहीत असल्याचं बघून विशेष वाटलं. त्यांनी घेतलेलं मित्राचं नाव ऐकून माझ्या लक्षात आलं ,कोण आहेत ते त्यांचे मित्र . पुढं सांगू लागले, माझा क्लासमेट...
मी म्हणालो माहीत आहेत मला ते. एकदा भेटलो सुद्धा आहे त्यांना. तर म्हणाले..व्वा...बघा ,कुठल्या कुठं गाठ पडली आपली...योगच म्हणायचा...पुढं ते बोलले, त्यो माझ्या कवितां साठी चित्रं काढणार हाय...मी पुन्हा चकित.... तुम्ही कविता लिहिता? होय..वह्या भरल्यात ढीगभर...लावण्या पण रचल्यात वीसेक..मी आश्चर्याने  त्यांच्याकडे पहात राहिलो. आता मला उत्सुकता लागली. त्यांना म्हंटलं ऐकवता का  एखादी कविता...
लगेच तयार झाले..
आणि त्या रस्त्यालगतच्या त्या पुरातन वृक्षांच्या सानिध्यात त्यांनी अनेक कविता, लावण्या आठवतील तशा म्हणून दाखवल्या. किती वेळ गेला यात काय कळलंच नाही. त्यांचा मोबाईल वाजू लागला. पलीकडून कोणी तरी चौकशी करत होत. हे त्याला सांगत होते, याय लागलोय...एकजण भेटल्यात; आम्ही जरा बोलत थांबलोय. येतो ..ठेव फोन..असं म्हणून त्यांनी फोन खिशात ठेवला. पुढं विषय सुरू पोवाडे लिहिल्यात.. घुबडावर एक कविता लिहिल्याली हाय...भरभरून बोलत होते.
अनेक कविता त्यांनी ऐकवल्या. सगळ्या मुखोद्गत. अनेक गोष्टींचा हा माणूस विचार करतोय हे त्यांनी जे लिहिलंय त्यावरून जाणवत होतं. एक घुबड त्याची व्यथा मांडतय, माणूस त्याच्याकडे अशुभ म्हणून बघतोय हे त्याचं दुःख.. शेतकऱ्यांना नाडणारे कारखानदार, निसर्गाचा बेभरवशिपणा, त्यामुळे व्यथित शेतकऱ्याची कैफियत..आणखी एक तर एकदम मोटिव्हीशनल टाईपची कविता ऐकवली. आयुष्य एकदाच मिळतं जगायला हवं, जग स्पर्धेचं आहे त्यात तुला छाती काढून उभं रहायला हवं, प्रत्येक संधीला तुला व्हाय नॉट म्हणायला हवं... असलं ही काय काय त्यांनी रचलंय. कवी आता ऐन रंगात आले होते. आता ही एक लावणी बघा कशी वाटत्या.. ऐका...
मुखी रंगला  इष्काचा विडा अन धनी माझा सातारी कंदी पेढा...हे ऐकून तर भारी मजा वाटली. एकदम कंदी पेढाच...
इतक्यात पुुन्हा फोन ची रिंग...फोन बघून म्हणाले ,घरातली माणसं वाट बघत बसल्यात.... मग मीच म्हणालो ,चला जाऊया.स्टार्टर मारला .निघालो . जाताना विषय ,अर्थातच कविता ..पुस्तक काढायचं हाय वो....दोस्त चित्रं काढून देणार हाय. चित्रं असल्यावर कसा उठाव येतोय पुस्तकाला... ते झालं की पुढच बघायचं. मी म्हणालो ,पण आजकाल तर स्वतःच पैसे खर्चून पुस्तकं काढावी लागतात कवितेची. तर म्हणाले, हां.. तेच अवघड हाय. वाटेत जागोजागी पळस बहरलेले दिसत होते. एका गच्च बहरलेल्या पळसा समोर थांबलो.बघत राहिलो. ते म्हणाले, पलाश म्हणत्यात हेला. मी विचारात ...पलाश म्हणजे याचं हिंदी भाषेतलं नाव.....आपल्याकडे कोणी सहसा पलाश म्हंटलेलं ऐकलं नव्हतं मी. विचारणार त्यांना तेव्हड्यात मोबाईल वाजला. निघालो पुन्हा पुढे. त्यांचं बोलणं ऐकत निघालो. मला लई जण सांगत्यात ते काय व्हाट्सयाप असतंय तेच्यावर तुमचा व्हिडीओ करून पाठवा म्हणून. पण त्यातलं काय आपल्याला कळत न्हाय...तेच्यावर पाठीवल की ते सगळीकडं जातंय म्हणत्यात... रस्त्यावर अचानक एका कडेला थांबलेल्या तरुणाने हात केला. आणि ओरडून म्हणाला , वो..अवो पुढं कुठं निघालाय... ते ऐकून मागचा माणूस एकदम भानावर आला,बघा बोलायच्या नादात पुढं निघालो..म्हेवन्यानं बघितलं मला म्हणुन बरं...
थांबलो. ते उतरले. जाता जाता माझा नंबर एक खिशातल्या एका चिठोर्यावर लिहून घेतला. मी लिहिलेलं नाव वाचून त्यांना यासिन भाई आठवला...यासीनभाईनं माझ्या लावण्यासनी चाली लावल्यात. एक मुखडा गुणगुणत राहिले...रंगात आले..त्यांना म्हंटल ,म्हणा की आणखी थोडं...थोडं म्हणून दाखवलं. तोपर्यंत तो तरुण लागला घाई करायला. सगळी वाट बघत बसल्यात चला जाऊया...जाता जाता म्हणाले या कवा तिकडं बिळाशी कडं आला तर...ठीक आहे म्हणत मी गाडी स्टार्ट केली. 
अशी ऑफलाईन आयुष्य जगणारी नादिष्ट्य लोकं त्यांच्या त्यांचा नादात कायमच ऑनलाइन मशगुल असतात....काहीतरी लिहावंसं वाटत रहाणं हे विशेष वाटलं, त्यात साहित्यमुल्य किती त्याचा दर्जा काय या गोष्टी नंतरच्या..त्या कवीचं रसरशीत जगणं आणि ते शब्दातून मांडणं हे महत्वाचं वाटलं.

   आडमार्गावर भेेेटलेेला कवी
    
©अन्वर हुसेन 2019


Wednesday, 15 July 2020

तीन नंबरची कॅसेट

तीन नंबरची कॅसेट..
या टेपरेकॉर्डर ने खूप अफाट लोकांची ओळख करून दिली. चौथी त असेन तेंव्हा वडिलांनी तो आणला होता. कॅसेट्स ही जमा केल्या होत्या बऱ्याच. काहींवर कलाकारांचे, सिनेमाचे फोटो असायचे तर काही कॅसेटवर ओळीने वडिलांनी त्याच्या सुंदर अक्षरात क्रमाने येणारी गाणी लिहिलेली असायची. त्यावर सकाळी बहुतेक वेळेला रेडिओ चालू असायचं. सकाळी जाग आली की कानावर तेच पडायचं. त्यावेळी टीव्ही नव्हता. संध्याकाळी मात्र वेगवेगळ्या प्रकारची गाणी वाद्यसंगीत शास्त्रीय मधलं काहीतरी असं लावलेलं असायचं. रात्री झोपताना सुद्धा गाणी चालू असायचीच. त्या रात्रीची वेळी जी गाणी वडिलांनी लावलेली असायची त्या गाण्याचा खूप काहीतरी वेगळाच असर व्हायचा. दिवे बंद करून अंथरुणात पडलेलो असताना ती गाणी ऐकू येत रहायची. त्या कॅसेट मधली सगळी गाणी खूप वेगळ्या प्रकारची वाटायची त्यावेळी. ती कॅसेट लावलेली असली की झोप लवकर यायचीच नाही. ती गाणी ऐकत असताना खूप भरून आल्यासारखं वाटत रहायचं, रडू यायचं. एका मागून एक गाणी लागत रहायची. ती सगळी त्या एका मुड मधलीच असायची. रात्रीच्या शांत वातावरणात मनात कालवाकालव वाढत जायची. शब्द, अर्थ बाकी काही अर्थातच कळायचं नाहीच. पण तो गाणाऱ्या बाईचा आवाज आणि त्या गाण्यातलं जे वातावरण असायचं जी वाद्य वाजायची ते काहीतरी वेगळं जाणवत रहायचं. ती गाणारी ती गायिका म्हणजे लता मंगेशकर हे लवकरच कळलं. तिचा एक फोटो वडिलांनी फ्रेम करून आणून घरात लावलेला. ड्रॉवर मधल्या प्रत्येक कॅसेट वर नंबर घातलेले असायचे वडिलांनी. ती रात्री जी लावली जायची ती तीन नंबर ची कॅसेट होती. ती कॅसेट म्हणजे एक वेगळंच काहीतरी वाटायचं मला तो ड्रॉवर उघडून बघत असताना. त्या त्या कॅसेट चा नंबर आणि त्यात वेगवेगळ्या मूड नुसार भरून आणलेली गाणी , आणि त्या कॅसेट वर्षानुवर्षे ऐकत राहून त्या नंबर चा आणि त्या कॅसेट मधल्या गाण्यांच्या मूड किंवा एखादा कलाकार गायक गायिका असं अजब कॉम्बिनेशन डोक्यात तयार झालं होतं. जसं एक नंबर ची कॅसेट बिस्मिल्ला खान आणि विलायत खान यांची जुगलबंदी असलेली.. दोन नंबर कॉल ऑफ दि व्हॅली..सहा नंबर अभंग ....तेरा नंबर immortal melodies by Rafi...तसं ते तीन नंबर ची कॅसेट म्हणजे लता मंगेशकर आणि तो मूड..आणि रात्री लागणारी गाणी. खूप गाणी खूप प्रकारची या टेपरेकॉर्डर वर ऐकली. पुढं काही दिवसांनी गायक गायिका यांच्या शिवाय संगीतकार ते गाणं लिहिणारे त्यातली वेगवेगळी वाद्य वाजवणारे असे खूप लोक त्या गाण्यात सहभागी असतात हे कळलं. कधीतरी हे पण कळलं, ती जी तीन नंबर ची कॅसेट आहे त्यातली बहुतेक सगळी गाणी मदन मोहन या संगीतकाराची आहेत. पुढे हायस्कुल, कॉलेज.. काहीही आडवं तिडवं ऐकणं हे चाललेलं.. आवडीच्या कॅसेट्स शोधून आणू लागलो आता. तो नाद लागला. आणखी नवनवीन कलाकार माहीत होऊ लागले. एक दिवशी वडील त्या ड्रॉवर मध्ये कुठलीतरी कॅसेट शोधत होते पण ती सापडत नव्हती घरात सगळीकडे शोधली, नाही सापडली. ते अस्वस्थ झाले होते. कुणाला दिली होती का ऐकायला, कुणी ऐकायला म्हणून नेली होती का.. काहीच आठवत नव्हतं. अनेकांना फोन करून विचारलं..ती कॅसेट तुम्ही ऐकायला घेऊन गेला आहे का..कुणाकडेच सापडली नाही..ती तीच तीन नंबर ची कॅसेट होती. त्या दिवसात तो एक विषयच होऊन बसलेला, ती तीन नंबर ची कॅसेट गेली कुठे..रुखरुख लागून राहिली. त्या सुमारालाच टेप रेकॉर्डर कॅसेट्सचा काळही मागे पडत चालला होता, नवीन म्युझिक सिस्टीम आलेली घरात. यात कॅसेट बरोबर सिडी प्लेयर आला. नवनवीन सीडी यायला लागल्या घरात. काही खास कॅसेट्स सिडीवर कन्व्हर्ट करून घेतल्या बऱ्याच खटपटी करून. त्या तीन नंबर कॅसेट ची मात्र रुखरुख मनात होतीच.. मग त्यातली गाणी असलेली सीडी शोधत राहिलो. तशीच्या तशी लिस्ट मधली मिळणं अवघडच. त्यासाठी वेगवेगळ्या सीडीज घ्याव्या लागल्या पण त्या कॅसेट सारखा तो मूड जमत नव्हता..त्या कॅसेट ची आठवण परत यायची. ती गाणी शोधता शोधता त्या गाण्यांचा नाद लागला मग. लहानपणी ऐकलेली ती आता पुन्हा ऐकू लागलो. आता तीच गाणी खूप वेगळी वाटू लागली. जसजशी ऐकत राहिलो ती आवडत गेली. मग आणखी शोधत राहिलो. मदन मोहन ची गाणी होती ही. नव्यानं भेटली होती मला. ती ऐकताना आताही तसंच आतून भरून आल्यासारखं होतं. पण त्याचबरोबर काहीतरी व्यक्त करण्यापलीकडचं सापडल्यासारखं वाटतं..त्यातल्या खूप गोष्टी नव्यानं कळल्या. आणि मग ऐकत राहिलो या माणसाचं संगीत, झपाटून टाकलं त्यानं..दिल की नाजुक रगें टूटती है.. मैंने जज़्बात निभाए है उसूलों की जगह...अधूरा हूँ मैं अफसाना.. आणि खुप असलंच काही जहरी हा ऐकवत राहतो..याला ऐकत रहावं.. कुठल्याही नशे पेक्षा यात जास्त धुंदी आहे याच्या संगीतात..वाईट चढत जाते... त्याला ऐकताना ती तीन नंबर ची हरवलेली कॅसेट अजूनही आठवते, आणि लहानपणीच्या त्या रात्रीही आठवतात..

अन्वर हुसेन/ 14 जुलै 2020 
14 जुलै, मदन मोहन चा स्मृतिदिन..

Wednesday, 1 July 2020

डिअर मोने...


डिअर मोने…
किसी पुरानी सी इमारत पे

पल पल बदलती धूप-छाँव देखता हुँ 

तो तुम्हारी ही याद आती है…

तुम्हारे ब्रश से निकले अनगिनत रंगों के स्ट्रोक्स 

सामने दिखने लग जाते हैं…
वो जो स्टेशन में आती रेल का धुँवा तुम ने देखा वो

मेरे स्टुडिओ के मेज पे रखी 

तुम्हारी चित्रों की किताब से बाहर आता दिखता है मुझे कई बार….

सुज़ैन की पेन्टिंग बनाई थी तुमने ,

हाँ वहीं…धुप में छतरी लिए वो खड़ी है जिसमें..
उस वक्त खुली हवा जो लहरा रही थी उसके आसपास 

मै महसूस कर सकता हूँ बिल्कुल आज भी..
और महसूस कर सकता हु उस वक्त के धूप की गर्माहट…
पल पल बदलती धूप छाँव में बेशुमार रंग ढूंढे तुमने…
कुछ पल की जिंदगी जीने वाली वाटरलिली को 

एक उम्र बख़्श दी तुम ने…
डिअर मोने…
पानी पे तैरती धूप तुम्हारे कैनवास पे वैसीही तैर रही है….
पेड़ो पत्तों के बीच से गुज़रते जमीन पे बगीचे में रखे मेज पे…
और..वो पेड़ के छाँव में बैठे किताब पढ़ती कैमिली,
उसके कपड़ों पे भी अभी तक वो धूप के टुकड़े थरथरा रहें है वैसेही जैसे 1872 के बसंत ऋतु में तुम्हारे ब्रश से उतरे थे..
रंगों को आँखोंमें समेटते तुम्हारी आँखे थक गई जब…
आंखों की रोशनी बुझने लगी.. 

फिर भी तुम पैलेट पे रंगों की रोशनी ढूंढते रहे ..

ये कैसी जिजीविषा थी तुम में..
डिअर मोने
समय को तुम ने बदलती रोशनी के ज़रिए चित्र में तब्दील किया…
और
वो सब चित्र एक सिम्फनी बन गए …
समय की सिम्फनी…
धूप छाँव की सिम्फनी…
रंगों की सिम्फनी..
लगातार देख रहे है लोग सालों साल वो सिम्फनी…
डिअर मोने….

©अन्वरहुसेन2019

    स्केच बुक

    कॉलेजमध्ये असताना स्केचबुक असायचं जवळ. त्यात स्केचेस करायचो कधी कधी. शिक्षकांनी सांगितलेलं असायचं, उद्या येताना दहा स्केचेस पाहिजेत. मग कॉले...