रस्त्याच्या दोन्हीकडे लांबवर पसरलेलं लँडस्केप बघत निवांत निघालो होतो.रस्त्यावर जवळपास एकटाच दिसत होतो मी. वाहनं ही फार कमी येतजात होती. दूरवर एकजण रस्त्याकडेला उभा दिसत होता. मी पण त्या माणसाला दिसलो असेन त्याच्या दिशेनं येताना. त्यांनी हात केला, थांबण्यासाठी....तोवर मी त्यांच्या जवळ आलोच होतो. थांबलो. पुढे ढगेवाडी फाट्यापर्यंत सोडणार का? त्यांनी विचारलं. शक्यतो असं फिरताना मी कुणाला घेत नाही गाडीवर. एक तर मी रस्त्यात अनेक वेळा थांबत असतो.अनेक गोष्टी दिसत असतात. मग थांबून ते बघणं आलं. वाटलं तर स्केच करायचं असतं. फोटो काढायचे असतात. त्यामुळं मी त्यांना सरळ सांगतो, मी वाटेत बऱ्याचदा थांबत थांबत जाणार आहे. असं सांगितल्यावर विचारणारा म्हणतो ,मग जावा.... या आत्ता हात दाखवलेल्या व्यक्तीला पण मी तसंच सांगितलं. मला वाटलं मग जा तुम्ही असं म्हणेल.. ती व्यक्ती म्हणाली, असुदे की ...चालतंय..मला बी निवांतच जायाचं हाय...मनात म्हंटल, लोकांना लवकरात लवकर पोहोचायचं असतं कुठूनतरी कुठे. आणि यांना निवांत जायचं आहे. चांगलं आहे... म्हंटल चला...वयस्कर माणूस होता. पुढे निघालो . बोलणं सुरू झालं. हे सगळं चाललं होतं कापरी - येडंफाटा या रस्त्यावर. NH4 हायवेला जाऊन मिळतो हा रस्ता पुढे. फोटो काढायला मला थांबायचं असतं असं म्हंटल्यावर त्यांनी विचारलं, तुम्ही अल्बम बनवताय का? नाही..मी म्हणालो. त्यांना कसला अल्बम अपेक्षित होता काय माहीत....
कुठलं ?
इकडं कुणीकडे निघालाय?
त्यांनी असं विचारल्यावर मी पण विचारात पडलो; खरंच इकडं कुठं निघालोय मी. शिराळ्याकडे जाताना डाव्या हाताला हा फाटा दिसतो दरवेळी. लहानसा सिंगल रोड. मनात आलं आणि आज तो रस्ता पकडला आणि निघालो . कुठं जातो हे पण माहीत नव्हतं. त्यांना जास्त काय सांगत बसलो नाही. असंच निघालोय..एवढंच म्हणालो.
त्यांना विचारलं, ढगेवाडी जवळच आहे का ?
होय म्हणाले. कुठून आलाय ? तर म्हणाले, बिळाशीसनं ...चरण बिळाशी...ते 1930 चं...प्रसिद्ध ..बंड.. तिथंन...एक कार्यक्रम हाय पावण्याकडं तिकडं निघालोय. येसटी चुकली...सगळं अगदी डिटेल मधे सांगितलं त्यांनी.
लाडेगाव 5 किलोमीटर असा बोर्ड मागे गेला.
काय करता तुम्ही? काहीतरी विचारायचं म्हणून मी विचारलं.
घरं बांधायची कामं घेतो.....
घरं बांधायची कामं म्हणजे नेमकं काय, याबद्दल त्यांना विचारणार इतक्यात...
डावीकडे रस्त्यालगत खूप झाडांची गर्दी दिसू लागली..वडाची झाडं.. जवळ आलो तर तो फारच वेगळा प्रकार दिसत होता. थांबलो. खूप जुन्या पुराण्या झाडाच्या पारंब्या फिरून जमिनीला मिळाल्या होत्या. खूपच वैशिष्ट्यपूर्ण गोलाकार रचना तयार झाली होती. चारी बाजूनी मोठाल्या पारंब्याची गर्दी आणि मधे मोकळी जागा. मी सोबत आलेल्याना म्हणालो , मी थांबणार आहे थोडा वेळ, तुम्हाला दुसरं कोणी भेटलं तर तुम्ही जा त्याच्या सोबत. तर म्हणाले, असुदे ..मी पण बघतो जरा ...तवर तुम्ही काढा फोटो..मग मी बघत राहिलो. चारी बाजूनी जमिनीत शिरलेल्या मोठाल्या पारंब्या ,त्यामुळे तयार झालेला अफलातून अवकाश...वेगळ्या जगात प्रवेश केल्यासारखं वाटलं. आणि मग अर्थातच तिथं माणसांनी अनेक आकारांचे शेंदूर फासलेले दगड ,झाडाला लहानमोठ्या घंटा ,झेंडे, तसबिरी, अमुक तमुक....हे सगळं पद्धतशीर मांडलेलंही आहे. एक बाई तर तिथं त्या 'देवा' बरोबर काही तरी बोलतही होती. दुसरं कुणी नव्हतं. आमची चाहूल लागल्यावर ती पलीकडे असलेल्या दुसऱ्या देवाकडे गेली. थोड्या वेळात बघायचं ते बघून, फोटो काढून पुढच्या बाजूला आलो. सोबतचे शांतपणे वाट पहात थांबले होते. कशासाठी काढताय फोटो ,सिनेमासाठी? त्यांचं माझ्याकडे सतत लक्ष होतं. खूप उत्सुकता लागलेली दिसली त्यांना...
चित्रं काढत असतो मी ,त्यासाठी उपयोग होतो ...मी म्हणालो. चित्र काढतोय हे ऐकल्यावर लगेच ते म्हणाले, हां...तरंच एव्हढं बघत फिरताय. माझा एक दोस्त हाय गावातला, त्यो बी ड्रॉइंग काढतोय. मुंबईला असतोय. जे जे स्कुल ला शिकवतोय...
अरे... जे जे स्कुल वगैरे.... मी लक्षपूर्वक ऐकू लागलो त्यांचं बोलणं. जे जे वगैरे या माणसाला माहीत असल्याचं बघून विशेष वाटलं. त्यांनी घेतलेलं मित्राचं नाव ऐकून माझ्या लक्षात आलं ,कोण आहेत ते त्यांचे मित्र . पुढं सांगू लागले, माझा क्लासमेट...
मी म्हणालो माहीत आहेत मला ते. एकदा भेटलो सुद्धा आहे त्यांना. तर म्हणाले..व्वा...बघा ,कुठल्या कुठं गाठ पडली आपली...योगच म्हणायचा...पुढं ते बोलले, त्यो माझ्या कवितां साठी चित्रं काढणार हाय...मी पुन्हा चकित.... तुम्ही कविता लिहिता? होय..वह्या भरल्यात ढीगभर...लावण्या पण रचल्यात वीसेक..मी आश्चर्याने त्यांच्याकडे पहात राहिलो. आता मला उत्सुकता लागली. त्यांना म्हंटलं ऐकवता का एखादी कविता...
लगेच तयार झाले..
आणि त्या रस्त्यालगतच्या त्या पुरातन वृक्षांच्या सानिध्यात त्यांनी अनेक कविता, लावण्या आठवतील तशा म्हणून दाखवल्या. किती वेळ गेला यात काय कळलंच नाही. त्यांचा मोबाईल वाजू लागला. पलीकडून कोणी तरी चौकशी करत होत. हे त्याला सांगत होते, याय लागलोय...एकजण भेटल्यात; आम्ही जरा बोलत थांबलोय. येतो ..ठेव फोन..असं म्हणून त्यांनी फोन खिशात ठेवला. पुढं विषय सुरू पोवाडे लिहिल्यात.. घुबडावर एक कविता लिहिल्याली हाय...भरभरून बोलत होते.
अनेक कविता त्यांनी ऐकवल्या. सगळ्या मुखोद्गत. अनेक गोष्टींचा हा माणूस विचार करतोय हे त्यांनी जे लिहिलंय त्यावरून जाणवत होतं. एक घुबड त्याची व्यथा मांडतय, माणूस त्याच्याकडे अशुभ म्हणून बघतोय हे त्याचं दुःख.. शेतकऱ्यांना नाडणारे कारखानदार, निसर्गाचा बेभरवशिपणा, त्यामुळे व्यथित शेतकऱ्याची कैफियत..आणखी एक तर एकदम मोटिव्हीशनल टाईपची कविता ऐकवली. आयुष्य एकदाच मिळतं जगायला हवं, जग स्पर्धेचं आहे त्यात तुला छाती काढून उभं रहायला हवं, प्रत्येक संधीला तुला व्हाय नॉट म्हणायला हवं... असलं ही काय काय त्यांनी रचलंय. कवी आता ऐन रंगात आले होते. आता ही एक लावणी बघा कशी वाटत्या.. ऐका...
मुखी रंगला इष्काचा विडा अन धनी माझा सातारी कंदी पेढा...हे ऐकून तर भारी मजा वाटली. एकदम कंदी पेढाच...
इतक्यात पुुन्हा फोन ची रिंग...फोन बघून म्हणाले ,घरातली माणसं वाट बघत बसल्यात.... मग मीच म्हणालो ,चला जाऊया.स्टार्टर मारला .निघालो . जाताना विषय ,अर्थातच कविता ..पुस्तक काढायचं हाय वो....दोस्त चित्रं काढून देणार हाय. चित्रं असल्यावर कसा उठाव येतोय पुस्तकाला... ते झालं की पुढच बघायचं. मी म्हणालो ,पण आजकाल तर स्वतःच पैसे खर्चून पुस्तकं काढावी लागतात कवितेची. तर म्हणाले, हां.. तेच अवघड हाय. वाटेत जागोजागी पळस बहरलेले दिसत होते. एका गच्च बहरलेल्या पळसा समोर थांबलो.बघत राहिलो. ते म्हणाले, पलाश म्हणत्यात हेला. मी विचारात ...पलाश म्हणजे याचं हिंदी भाषेतलं नाव.....आपल्याकडे कोणी सहसा पलाश म्हंटलेलं ऐकलं नव्हतं मी. विचारणार त्यांना तेव्हड्यात मोबाईल वाजला. निघालो पुन्हा पुढे. त्यांचं बोलणं ऐकत निघालो. मला लई जण सांगत्यात ते काय व्हाट्सयाप असतंय तेच्यावर तुमचा व्हिडीओ करून पाठवा म्हणून. पण त्यातलं काय आपल्याला कळत न्हाय...तेच्यावर पाठीवल की ते सगळीकडं जातंय म्हणत्यात... रस्त्यावर अचानक एका कडेला थांबलेल्या तरुणाने हात केला. आणि ओरडून म्हणाला , वो..अवो पुढं कुठं निघालाय... ते ऐकून मागचा माणूस एकदम भानावर आला,बघा बोलायच्या नादात पुढं निघालो..म्हेवन्यानं बघितलं मला म्हणुन बरं...
थांबलो. ते उतरले. जाता जाता माझा नंबर एक खिशातल्या एका चिठोर्यावर लिहून घेतला. मी लिहिलेलं नाव वाचून त्यांना यासिन भाई आठवला...यासीनभाईनं माझ्या लावण्यासनी चाली लावल्यात. एक मुखडा गुणगुणत राहिले...रंगात आले..त्यांना म्हंटल ,म्हणा की आणखी थोडं...थोडं म्हणून दाखवलं. तोपर्यंत तो तरुण लागला घाई करायला. सगळी वाट बघत बसल्यात चला जाऊया...जाता जाता म्हणाले या कवा तिकडं बिळाशी कडं आला तर...ठीक आहे म्हणत मी गाडी स्टार्ट केली.
अशी ऑफलाईन आयुष्य जगणारी नादिष्ट्य लोकं त्यांच्या त्यांचा नादात कायमच ऑनलाइन मशगुल असतात....काहीतरी लिहावंसं वाटत रहाणं हे विशेष वाटलं, त्यात साहित्यमुल्य किती त्याचा दर्जा काय या गोष्टी नंतरच्या..त्या कवीचं रसरशीत जगणं आणि ते शब्दातून मांडणं हे महत्वाचं वाटलं.
फार छान
ReplyDelete