Tuesday, 28 July 2020

व्यंकटेश अंकलचं घर



"आऊटडोर ला जाऊया की कुठंतरी एक दिवस" अनुप चा मेसेज..बरेच दिवस चाललं होतं, कुठंतरी लँडस्केप करायला जायचं. नक्की होत नव्हतं. पण त्याचा मेसेज आल्यावर ठरवलं,जाऊयाच..तसा त्याला रिप्लाय दिला. सोमवारी जाऊया. कुठं जायचं काय नक्की नव्हतं. सांगलीतच कुठंतरी जाऊ अस ठरलं. पटकन आठवलं ते वानलेसवाडी. ठरलं. सकाळी आलो वानलेसवाडीत. ऊन प्रचंड. मिरज रोड ला अगदी लागूनच ही वाडी. खूप पूर्वी इथं विल्यम वानलेस चेस्ट हॉस्पिटल होतं. त्यावेळच्या पेशंट साठी असलेल्या छोट्या छोट्या अनेक कौलारू कॉटेजेस अजूनही आहेत. आता त्यात काही लोकं राहतात. मोठ्या परिसरभर अशी स्वतंत्र सुटी सुटी घरं विखुरली आहेत. काही मोठाली ब्रिटिश शैलीतली घरं ऐस पैस निवांत पणे बसून राहिल्या सारखी दिसतात. एखादं दुमजली घर लांब रुंद व्हरांडे असलेलं. खूप झाडं सगळीकडे. सध्या मात्र उन्हामुळे हिरवाई हरवलेले. त्यांच्या रेषांच्या जाळ्यातून दिसणारी ती घरं. त्या वाटा, पायवाटा.. ठिकठिकाणी चित्रंच ठेवल्या सारखी दिसतात. एकूणच वर्दळ कमी असल्यानं एक स्तब्धता सगळीकडे पसरून राहिलेली असते. फिरता फिरता एक मोकळ्या जागे जवळ आलो. काही मुलं क्रिकेट खेळत होती त्या मोकळ्या मैदानात. अशा उन्हात. कडेने ठराविक अंतरावर घरं होती. नजर फिरत होती. एका ठिकाणी थांबली. बसायला सावली ही होती एक झाडाची. तिथंच बसलो. कॅनव्हास ब्रश रंग प्यालेट काढून पेंटिंगला सुरुवात केली. मुलांचा खेळ ऐन भरात आलेला तिकडे. क्वचित कुणी तरी चालत किंवा बाईक वरून जाणारा येणारा. समोरच्या घराचं गेट मागचा पांढरा रंग कौलांचा रंग ब्रशच्या स्ट्रोक्स च रूप घेऊन कॅनव्हास वर उमटत होते. सावल्यां चे आकार बदलत होते. रंग बदलत होते. वाळलेल्या झुडुपांनी त्याच्या रेषांमधून एक टेक्श्चर त्या दृश्याला दिल होतं. आणि त्या पिवळसर, ब्राउनिश करड्या छटांनी त्या उन्हात त्या दृश्याभोवती तटस्थता निर्माण केली होती. मागे कुठेतरी नाजूकपणे काही आकार चैत पालवीची जाणीव करून देताना दिसत होते. लाकडी गेट बघून काहीतर आठवत राहिलं पुन्हा पुन्हा. त्या घरातला एक जण खूप वेळ त्या गेट च्या खांबाला टेकून फोन वर बोलत उभा राहिला होता. चित्र पूर्ण होईस्तोवर दोनदा तो फोनवर बोलत उभा राहिला गेट पाशी येऊन. मग त्यालाही चित्रात घ्यावं लागलं. मुलांचा खेळ थांबला होता. ती पलीकडच्या मोठ्या झाडांच्या सावलीत बसून राहिली होती. चित्र पूर्ण होत आलेलं. त्या मुलांचं माझ्याकडे लक्ष गेलं. त्यातली काहीजण आली जवळ. चित्र बघत ,चित्रातलं घर नेमकं कुठलं यावर बोलत राहिली. त्यांनी ओळखलं. अरे हे व्यंकटेश अंकल चं घर. आणि अंकल पण आहे चित्रात….
मला चित्रांचं टायटल मिळालं…
व्यंकटेश अंकल चं घर…..



©अन्वर हुसेन2019

No comments:

Post a Comment

स्केच बुक

कॉलेजमध्ये असताना स्केचबुक असायचं जवळ. त्यात स्केचेस करायचो कधी कधी. शिक्षकांनी सांगितलेलं असायचं, उद्या येताना दहा स्केचेस पाहिजेत. मग कॉले...