तीन नंबरची कॅसेट..
या टेपरेकॉर्डर ने खूप अफाट लोकांची ओळख करून दिली. चौथी त असेन तेंव्हा वडिलांनी तो आणला होता. कॅसेट्स ही जमा केल्या होत्या बऱ्याच. काहींवर कलाकारांचे, सिनेमाचे फोटो असायचे तर काही कॅसेटवर ओळीने वडिलांनी त्याच्या सुंदर अक्षरात क्रमाने येणारी गाणी लिहिलेली असायची. त्यावर सकाळी बहुतेक वेळेला रेडिओ चालू असायचं. सकाळी जाग आली की कानावर तेच पडायचं. त्यावेळी टीव्ही नव्हता. संध्याकाळी मात्र वेगवेगळ्या प्रकारची गाणी वाद्यसंगीत शास्त्रीय मधलं काहीतरी असं लावलेलं असायचं. रात्री झोपताना सुद्धा गाणी चालू असायचीच. त्या रात्रीची वेळी जी गाणी वडिलांनी लावलेली असायची त्या गाण्याचा खूप काहीतरी वेगळाच असर व्हायचा. दिवे बंद करून अंथरुणात पडलेलो असताना ती गाणी ऐकू येत रहायची. त्या कॅसेट मधली सगळी गाणी खूप वेगळ्या प्रकारची वाटायची त्यावेळी. ती कॅसेट लावलेली असली की झोप लवकर यायचीच नाही. ती गाणी ऐकत असताना खूप भरून आल्यासारखं वाटत रहायचं, रडू यायचं. एका मागून एक गाणी लागत रहायची. ती सगळी त्या एका मुड मधलीच असायची. रात्रीच्या शांत वातावरणात मनात कालवाकालव वाढत जायची. शब्द, अर्थ बाकी काही अर्थातच कळायचं नाहीच. पण तो गाणाऱ्या बाईचा आवाज आणि त्या गाण्यातलं जे वातावरण असायचं जी वाद्य वाजायची ते काहीतरी वेगळं जाणवत रहायचं. ती गाणारी ती गायिका म्हणजे लता मंगेशकर हे लवकरच कळलं. तिचा एक फोटो वडिलांनी फ्रेम करून आणून घरात लावलेला. ड्रॉवर मधल्या प्रत्येक कॅसेट वर नंबर घातलेले असायचे वडिलांनी. ती रात्री जी लावली जायची ती तीन नंबर ची कॅसेट होती. ती कॅसेट म्हणजे एक वेगळंच काहीतरी वाटायचं मला तो ड्रॉवर उघडून बघत असताना. त्या त्या कॅसेट चा नंबर आणि त्यात वेगवेगळ्या मूड नुसार भरून आणलेली गाणी , आणि त्या कॅसेट वर्षानुवर्षे ऐकत राहून त्या नंबर चा आणि त्या कॅसेट मधल्या गाण्यांच्या मूड किंवा एखादा कलाकार गायक गायिका असं अजब कॉम्बिनेशन डोक्यात तयार झालं होतं. जसं एक नंबर ची कॅसेट बिस्मिल्ला खान आणि विलायत खान यांची जुगलबंदी असलेली.. दोन नंबर कॉल ऑफ दि व्हॅली..सहा नंबर अभंग ....तेरा नंबर immortal melodies by Rafi...तसं ते तीन नंबर ची कॅसेट म्हणजे लता मंगेशकर आणि तो मूड..आणि रात्री लागणारी गाणी. खूप गाणी खूप प्रकारची या टेपरेकॉर्डर वर ऐकली. पुढं काही दिवसांनी गायक गायिका यांच्या शिवाय संगीतकार ते गाणं लिहिणारे त्यातली वेगवेगळी वाद्य वाजवणारे असे खूप लोक त्या गाण्यात सहभागी असतात हे कळलं. कधीतरी हे पण कळलं, ती जी तीन नंबर ची कॅसेट आहे त्यातली बहुतेक सगळी गाणी मदन मोहन या संगीतकाराची आहेत. पुढे हायस्कुल, कॉलेज.. काहीही आडवं तिडवं ऐकणं हे चाललेलं.. आवडीच्या कॅसेट्स शोधून आणू लागलो आता. तो नाद लागला. आणखी नवनवीन कलाकार माहीत होऊ लागले. एक दिवशी वडील त्या ड्रॉवर मध्ये कुठलीतरी कॅसेट शोधत होते पण ती सापडत नव्हती घरात सगळीकडे शोधली, नाही सापडली. ते अस्वस्थ झाले होते. कुणाला दिली होती का ऐकायला, कुणी ऐकायला म्हणून नेली होती का.. काहीच आठवत नव्हतं. अनेकांना फोन करून विचारलं..ती कॅसेट तुम्ही ऐकायला घेऊन गेला आहे का..कुणाकडेच सापडली नाही..ती तीच तीन नंबर ची कॅसेट होती. त्या दिवसात तो एक विषयच होऊन बसलेला, ती तीन नंबर ची कॅसेट गेली कुठे..रुखरुख लागून राहिली. त्या सुमारालाच टेप रेकॉर्डर कॅसेट्सचा काळही मागे पडत चालला होता, नवीन म्युझिक सिस्टीम आलेली घरात. यात कॅसेट बरोबर सिडी प्लेयर आला. नवनवीन सीडी यायला लागल्या घरात. काही खास कॅसेट्स सिडीवर कन्व्हर्ट करून घेतल्या बऱ्याच खटपटी करून. त्या तीन नंबर कॅसेट ची मात्र रुखरुख मनात होतीच.. मग त्यातली गाणी असलेली सीडी शोधत राहिलो. तशीच्या तशी लिस्ट मधली मिळणं अवघडच. त्यासाठी वेगवेगळ्या सीडीज घ्याव्या लागल्या पण त्या कॅसेट सारखा तो मूड जमत नव्हता..त्या कॅसेट ची आठवण परत यायची. ती गाणी शोधता शोधता त्या गाण्यांचा नाद लागला मग. लहानपणी ऐकलेली ती आता पुन्हा ऐकू लागलो. आता तीच गाणी खूप वेगळी वाटू लागली. जसजशी ऐकत राहिलो ती आवडत गेली. मग आणखी शोधत राहिलो. मदन मोहन ची गाणी होती ही. नव्यानं भेटली होती मला. ती ऐकताना आताही तसंच आतून भरून आल्यासारखं होतं. पण त्याचबरोबर काहीतरी व्यक्त करण्यापलीकडचं सापडल्यासारखं वाटतं..त्यातल्या खूप गोष्टी नव्यानं कळल्या. आणि मग ऐकत राहिलो या माणसाचं संगीत, झपाटून टाकलं त्यानं..दिल की नाजुक रगें टूटती है.. मैंने जज़्बात निभाए है उसूलों की जगह...अधूरा हूँ मैं अफसाना.. आणि खुप असलंच काही जहरी हा ऐकवत राहतो..याला ऐकत रहावं.. कुठल्याही नशे पेक्षा यात जास्त धुंदी आहे याच्या संगीतात..वाईट चढत जाते... त्याला ऐकताना ती तीन नंबर ची हरवलेली कॅसेट अजूनही आठवते, आणि लहानपणीच्या त्या रात्रीही आठवतात..
अन्वर हुसेन/ 14 जुलै 2020
14 जुलै, मदन मोहन चा स्मृतिदिन..
No comments:
Post a Comment