पुण्याहून येत होतो परत, रात्री वेळानेच स्वारगेटवरून निघालो होतो. कात्रज घाट ओलांडून बस हायवेला लागली. खिडकीतून येणाऱ्या मस्त वाऱ्याने कधी झोप लागली कळलंच नाही.
काहीतरी छान ऐकू येत होतं...
अर्धवट जाग असण्याच्या अवस्थेत..
खूप धुंद करणारं काहीतरी...मी कुठं आहे ,भवती काय आहे ..काही भान नव्हतंच..
ती सुरावट , तो आवाज मला अलगद घेऊन निघाला होता त्याच्या मागोमाग... हम भटकते हैं, क्यों भटकते हैं, दश्तो-सेहरा मे..... झोपेचा अंमल कमी होऊन मी त्या खिडकीतून येणाऱ्या गाण्याच्या पूर्ण अंमलाखाली गेलेलो..मध्यरात्रीच्या त्या वेळेला त्या थंड हवेसोबत येणाऱ्या त्या संतूर व्हॉयोलिन च्या सुरांनी माझ्या पूर्ण मन मेंदूचा ताबा घेतला होता..आणि भरीला लता चा आवाज...गाण्यातला तो विलक्षण ठहराव मला दूर कुठल्यातरी प्रदेशात घेऊन गेलेला....
ऐसा लगता है, मौज प्यासी है, अपने दरिया में...
कैसी उलझन है, क्यों ये उलझन है...
एक साया सा, रू-ब-रू क्या है...
तो प्रदेश खूप वेगळा होता. संतूर चे ते सुंदर पिसेस मला त्यातले रंग दाखवत होते. व्हॉयोलिन चे पिसेस मला तिथली गहराई दाखवत होते..आणि तो आवाज मनातल्या कुठल्याशा अनाम दुःखाला वाट करून देत होता...
तो येणारा आवाज थांबला. मी अजूनही त्याच धुंद अवस्थेत...नको वाटत होतं त्या अवस्थेतून बाहेर यायला..
पण हळूहळू भान येऊ लागलं..बस कुठे तरी थांबलेली होती. हायवे कडेच्या धाब्यावर..प्रवासी उतरले होते बरेचसे जेवणा साठी, बस मध्ये तुरळक लोक होते, तेही झोपलेले. शेजारी एक ट्रक उभा होता, त्यात टेप वाजत होता.. मध्य रात्री अर्धवट जागेपणी ती विलक्षण अनुभूती होती...
खय्याम च्या गाण्यांची प्लेलिस्ट रात्र सुसह्य करतेय गेली अनेक वर्षे.....
मनाला शांत करणारा कलावंत..
खूप आनंद देणारा कलावंत...
आज त्यांचा स्मृती दिन..
आपल्या अटींवर, आपल्याच धुंदीत जगलेला संगीतकार...
No comments:
Post a Comment