सुंदर वास्तूंचं दुर्लक्षित गाव..
कळायला लागल्यापासून काळ्या दगडातली ती भक्कम तटबंदी डोळ्यांसमोर दिसत होती. घराच्या समोरच. लांब रुंद पसरलेली. त्या तटबंदीत बरीच खोल्या होत्या. काही एकमजली काही दुमजली कौलारू. बाहेरून अनेक खिडक्या दिसत रहायच्या. त्या ही बारीक जाळी लावलेल्या. त्यामुळे आत नेमकं काय आहे हे कळायचं नाही. तटबंदीच्या मध्य भागी प्रचंड उंच कमान. वरच्या बाजूला अर्ध गोल आकार असलेली. कमानीच्या वर एक चौरसाकृति खोली. तिला समोरच्या बाजूला लाकडी गॅलरी सारखा भाग. तिथं येण्यासाठी दरवाजा आणि त्या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या उभट आकाराच्या खिडक्या. कमानी ला दोन्हीकडे मजबूत लोखंडी गेट. असा एकूण माहौल. खूप गूढ आणि भीतीदायक वाटायचं तेंव्हा. त्या तटबंदी च्या खोल्यांमध्येच मराठी शाळा भरायची. शाळेत जायचं वय झाल्यावर गावात एकच शाळा असल्याने साहजिकच त्याच शाळेत जावं लागलं. मग रोज त्या तटबंदीच्या आत जावं लागायचं. त्या गूढ वातावरणात. सगळं गाव राजवाडा म्हणायचं या इमारतीला. रोज जाऊन बऱ्यापैकी सरावलो. तटबंदी च्या आत मोठं मोकळं आवार आणि मधल्या जागेत आणखी एक मोठाली इमारत होती. प्रचंड मोठा लाकडी दरवाजा दिसायचा. कायम कुलूपबंद असलेला. निर्मनुष्य. सगळ्या खिडक्या बंद. मधल्या सुट्टीत त्या दरवाज्या जवळ जाऊन मुलं खेळत बसायची. मोठाल्या दरवाज्याच्या फटीतून आत काय दिसतंय का याची खूप उत्सुकता असायची. आतमध्ये मोठा दगडी चौक दिसायचा. उंचच उंच खांब कट्टे आत आत गेलेले गर्द काळोखात मर्ज होऊन जाताना दिसायचे. तो स्तब्ध गर्द अवकाश संबंध परिसर आणि इमारतीबद्दल वाटणारं गूढ आणखी वाढायचा. पुढं मित्रांबरोबर किंवा एकटाच गावात वेगवेगळ्या ठिकाणी खेळायला किंवा उगीचंच हिंडत रहायचो तर गावात अशा प्रकारच्या अनेक इमारती दिसू लागल्या. गावातलं पोस्ट ऑफिस, सरकारी दवाखाना, ग्रामपंचायतीची अतिशय देखणी इमारत, कवलापूर रस्त्याला ईदगाह मैदानाच्या वाटेवर असलेल्या इमारती , ब्रिटिश शैलीतले बंगले, गावाबाहेर एकाकी असलेलं मंदिर, गावाला वेढा घालणारा तो रस्ता, ज्याला सगळे चक्कर सडक म्हणतात. जिमखाण्याची इमारत त्याच्या शेजारी असलेली पुस्तकांनी भरलेली लायब्ररीची इमारत.अशा गावभर असलेल्या इमारतींविषयी आणि इतर गोष्टींविषयीकुतूहल वाटू लागलं. याची रचना, आकार, ते ऐसपैस व्हरांडे, दुसर्या कुठल्या गावात तेंव्हा असं काही सहसा दिसायचं नाही. त्यामुळे बुधगाव म्हणजे वेगळंच गाव वाटायचं. मग हळूहळू समजत गेलं की हे गाव म्हणजे संस्थान होतं पूर्वी. पटवर्धन इथले संस्थानिक होते. आणि घरासमोर जी अवाढव्य तटबंदी आहे तो त्यांचा रहायचा वाडा होता एके काळी. गावातल्या अनेक दुकानात घोड्यावर बसलेल्या, शिकार केलेल्या प्राण्यांसोबत, त्या उंच कमानी समोर घोड्यावर बसून काढलेले अनेक ब्लॅक व्हाइट फोटो दिसत रहायचे. त्या इमारती, ते गावभर दिसणारे फोटो यातून संस्थानिकांचा एके काळाचा रुबाब दिसत रहायचा. पुढं आणखी गोष्टी कळत गेल्या हे मिरज ज्युनियर संस्थान म्हणतात. मिरज संस्थानांत वाटणी होऊन हा भाग वेगळा झालेला. बुधगाव त्याची राजधानी होती. हा झाला भूतकाळ . पण मी शाळेत असताना त्या संस्थानिकांचे जे वारस मला दिसायचे गावात ते त्या वाड्याच्या तटबंदीमध्ये असलेल्या छोट्या खोल्यांमध्ये राहताना दिसत होते. सकाळी रोज त्यातल्या एकाला रिक्षा घेऊन जाताना मी बघायचो. कधीतरी तटबंदीच्या आत जो मुख्य राजवाडा होता तो पाडून टाकला त्यांनी. त्या वाड्यातले जे काही लाकडी खिडक्या चौकटी सागवानी उंचच उंच खांब सगळं विकून टाकलं. त्यातल्या काही खिडक्या चौकटी गावातल्या अनेक लोकांनी विकत घेऊन वापरल्या. आतल्या मोकळ्या जागा प्लॉट पाडून विकून टाकल्या. तटबंदी अगदी अलिकडे पर्यंत चांगल्या अवस्थेत होती तिची ही दुरवस्था होत निघाली आहे. राजवाड्याच्या कामानीच्या वरच्या भागात 1905 या सालाचा उल्लेख दिसायचा. ते म्हणजे तो राजवाडा बांधून पूर्ण झाल्याचं साल होतं. होता. बालगंधर्व या वाड्यात येऊन रहायचे त्यांना इथं बघितलेले गावात अनेक लोक होते. आहेत. उस्ताद अब्दुल करीम खां साहेब जेंव्हा मिरजेत आले तेंव्हा दर्ग्यातल्या हजेरी नंतर त्यांचा पहिला जाहीर जलसा बुधगावच्या संस्थनिकांकडे झाला होता. असा त्यांच्या चरित्रात उल्लेख आहे. त्यांना बुधगावकरांनी स्वतःची बग्गी पाठवून बोलावून घेतले होते. अशा त्या काळातल्या अनेक मोठ्या कलावंताची ये जा या गावात असायची. त्या काळच्या अनेक भल्याबुऱ्या गोष्टी लहाणपणी ऐकल्या होत्या. तो काळ प्रत्यक्ष अनुभवलेल्यांपैकी आता कुणी क्वचितच हयात असेल. गावातल्या लोकांना आणि एकूणच लोकप्रतिनिधी प्रशासनाला आता त्या इमारती त्यातलं सौंदर्य त्यांचं ऐतिहासिक महत्व या विषयी कुठलीही आस्था दिसत नाही. हळूहळू त्या इमारती काळाच्या ओघात नष्ट होऊन जातील. सद्या काही इमारती अतिशय दुरावस्थेत आहेत. एकंदरीतच लहान पाणी अनुभवलेलं गावाचं सुंदर टुमदार रूप जाऊन गाव बकाल होऊन गेलंय. सध्या त्या इमारती वापरणार्यांनी आपापल्या सोयीनुसार गरजेनुसार चित्रविचित्र विसंगत जोड काम केलं आहे. पण तरीही गावात ज्या काही इमारती आत्ता अस्तित्वात आहेत त्यावरून त्यांच्या त्या काळातल्या वैशिष्ट्य पूर्ण सौंदर्याची कल्पना येऊ शकते. त्या काळातल्या वास्तूकलेचं एक रूप काही अंशी बुधगाव मध्ये अजूनही अनुभवता येऊ शकतं. सांगली पासून अगदी जवळ असलेलं बुधगाव हे वास्तू सौंदर्याची अनेक उदाहरणं असलेलं तरीही दुर्लक्षित असलेलं गाव आहे असं वाटत राहत. एकूणच या गावाच्या इतिहासाचा वेगवेगळ्या संदर्भाने शोध घेतला गेला पाहिजे असं सतत वाटतं.
©अन्वर हुसेन.
No comments:
Post a Comment