चित्रकार अभिनेता...
बुधगाव च्या जिल्हा परिषदेच्या शाळेत बहुतेक दुसरी च्या वर्गात असेन, एक दिवस शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सिनेमा दाखवायला नेलं होतं. गावातच. बुधगावात त्यावेळी दोन सिनेमाचे तंबू होते. त्यातला एक तर घराच्या अगदी शेजारीच होता. रोज रात्री नऊ च्या दरम्यान सिनेमा चालू व्हायचा तिथे. पण शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी त्या दिवशी सिनेमाची वेळ लवकरची ठेवली होती. थोडासा अंधार पडल्यावर लगेचच सिनेमा सुरू झाला होता. तो सिनेमा म्हणजे छत्रपती शिवाजी. त्यापूर्वी चित्रात, पुस्तकात, गावातल्या किराणा मालाच्या दुकानात शिवाजी महाराजांची मोठी फ्रेम केलेली तसबीर बघत असायचो. पडद्यावर पहिल्यांदाच बघत होतो. त्या वयात त्या सिनेमाचा तो अनुभव इतका विलक्षण होता की नंतर पुढे छत्रपती शिवाजी महाराज म्हंटलकी त्या सिनेमात ज्या अभिनेत्याने ती भूमिका साकारली होती तीच प्रतिमा मनावर कोरली गेली. नंतर कित्येक अभिनेत्यांनी महाराजांची भूमिका साकारली पण अजूनही ती लहानपणी गावातल्या तंबूत पाहिलेल्या सिनेमातल्या अभिनेत्याने साकारलेली महाराजांची प्रतिमा जशीच्या तशी आहे. त्या वेळी तो अभिनेता आहे, तो कोण, त्याच नाव काहीही माहिती नव्हतं. नंतर त्या सगळ्या गोष्टी कळल्या. चंद्रकांत मांढरे यांनी ती भूमिका साकारलेली. शिवाजी महाराज म्हणजे चंद्रकांत मांढरे हे मनावर बिंबूनचं गेलं. पुढं टीव्ही आले सगळीकडे. घरी पण आला. त्यावर मराठी सिनेमे लावायचे, मग बऱ्याचदा चंद्रकांत मांढरे दिसायचे. त्यांना सिनेमात बघायला भारी वाटायचं.
अगदी शेवटी त्यांना बनगरवाडी सिनेमात बघितलं होतं.
पुढं हायस्कुल झालं. चित्रकलेचा नाद लागला. पेन्सिल शेडिंग करायचो त्यावेळी. फारसं कुणाचं मार्गदर्शन वगैरे न घेताच जमेल तसं प्रयत्न करायचो. 10 वी च्या परिक्षे नंतर च्या सुट्ट्या होत्या. एक दिवस पेपर मध्ये वडिलांनी एक बातमी दाखवली. बातमीत लिहिलं होतं, प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रकार चंद्रकांत मांढरे सुट्टीमध्ये पावडर शेडिंग ची कार्यशाळा घेणार आहेत. बातमी वाचून आधी तर आश्चर्य वाटलं. आश्चर्य या साठी की चंद्रकांत मांढरे एक अभिनेते म्हणूनच आजवर माहीत होते ते चित्रंही काढतात हे माहीत नव्हतं. वडील म्हणाले बघूया जाऊन कोल्हापूरला. त्यांनी वेळ दिली होती त्या वेळेला गेलो दिलेल्या पत्त्यावर. तिथं गेलो, बरीच मूलं- मुली तिथं आलेली होती. त्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळच्या उजवीकडच्या खोलीत आम्हाला बाहेरच्या माणसाने पाठवलं. आत गेलो तर तिथं प्रत्यक्ष चंद्रकांत मांढरे समोर बसलेले. क्षणभर बघतच राहिलो त्यांच्याकडे. या वयातही किती रुबाबदार वाटत होते. वडिलांनी त्यांना सांगितलं, आम्ही कशासाठी आलोय ते. त्यांनी मग मला काही चित्रं आणली आहेत का ते विचारलं. अर्थातच मी चित्रांची फाईल घेऊन गेलोच होतो. त्यातली चित्रं त्यांना दाखवू लागलो एक एक करून. बघता बघता ते मला काही विचारतही होते चित्रांबद्दल. शिवाय पुढे काय करायचा विचार आहे त्याबद्दल ही विचारलं त्यांनी. तो पर्यंत आर्ट स्कुल ला जायचं विचार चाललेला होताच. कमर्शियल आर्ट करायचं असं काहीतरी चाललं होतं. तर त्यावर ते म्हणाले कमर्शियल कशाला फाईन आर्ट कडे घे ऍडमिशन. आपल्या मनासारखी चित्रं काढायची. मग ते जे मार्गदर्शन कार्यशाळा घेणार होते त्याबद्दल त्यांनी सांगितलं. रोज इस्लामपूर हुन येणार की इथंच कुठं राहणार...असं काय काय बोलणं झालं. त्या कार्यशाळेत त्यांनी मला प्रवेश दिला. आनंदात तिथून बाहेर पडलो. बाहेर आणखी एक उत्सुकता लागून राहण्याची गोष्ट आल्याआल्या बघितली होती. ती म्हणजे त्या बंगल्यात असलेलं म्युझियम. ते बघायचंच होतं मला. आत गेलो तर तिथं त्यांनी केलेल्या अनेक भूमिकांचे फोटोग्राफ्स लावले होते. पुढं त्यांची पावडर शेडिंग ची, वॉटरकलर मधली, ऑइल कलर मधली कित्येक चित्रं होती. जिथं जिथं ते शूटिंग साठी जायचे तिथं त्यांच्या सोबत चित्रकलेचं साहित्य असायचंच. शुटिंग मधून थोडा वेळ मिळाला मोकळा की ते चित्रात रमून जायचे. अशी शेकडो जल रंगातली निसर्ग चित्रं त्यांनी केली. ती त्या म्युझियम मध्ये पहायला मिळाळी. यातली काही चित्रं खूपच आवडून गेली. पन्हाळ्यावरची चित्रं, गुलमोहराचं चित्र,गुऱ्हाळाची चित्रं...आणि त्यांनी केलेलं शिवाजी महाराजांचं छोटंसं चित्र तर अप्रतिमच वाटतं मला. तिथून बाहेर पडलो ती सगळी चित्रं मनात घेऊनच. पण पुढे काही कारणाने मला त्या पावडर शेडिंग च्या कार्यशाळेला जाता आले नाही. पुढच्या सुट्टीत नक्की जाऊ असं ठरवलं, पण तेही नाहीच जमलं.
नंतर आर्ट स्कुल ला ऍडमिशन घेतली. सांगलीला, कलाविश्वला.
कोल्हापूर ला यायला नेहमीच आवडतं. खूप आवडत्या गावांपैकी आहे कोल्हापूर. तर मधेअधे काहीतरी निमित्ताने किंवा उगीचच कोल्हापूर ला येत राहतो. मग टाऊन हॉल म्युझियम, शाहू स्मारक , भवानी मंडप, एखाद्या चित्रकार मित्राचा स्टुडिओ असं भटकत रहाणं ठरलेलं असतं. कधीतरी मांढरेच्या म्युझियम पण आठवण येते तेव्हा तिथं पण चक्कर होतेच. पुन्हा एकदा ती सगळी चित्रं बघण्यात एक आनंद मिळतो.
मधे एकदा मुलांना घेऊन असंच फिरत फिरत हायवे सोडून जोतिबा कडे जाणाऱ्या रस्त्याला गेलो. नेमका गुऱ्हाळं चालू असण्याचा सीझन होता. त्या भागात अनेक गुऱ्हाळं चालू होती. सगळ्यांची लगबग जाणवत होती. वाटेवरच्या जवळपास प्रत्येक गुऱ्हाळा पाशी थांबून मुलांना आतून बाहेरून ती दाखवली. ती गुऱ्हाळं बघत असताना मला मांढरेची चित्रं खूप आठवत राहिली. ती चित्रं बघायची तीव्र इच्छा झाली. त्या परिसरातून फिरून तिथून कोल्हापुरात आलो. आणि सरळ मांढरेच्या म्युझियम मधेच आलो. आणि ती चित्रं पुन्हा पहिली. तो मुलांसाठी ही खूप वेगळा अनुभव होता नुकतीच बघितलेली गुऱ्हाळं, तिथं काम करणारी माणसं, ती तापलेल्या काहिलीतून उठणारी वाफ, ते धुराडं, त्यातून बाहेर पडणारा धूर. तो सगळा परिसर, तो माहौल इथं येऊन चित्रात बघताना खूप वेगळा अनुभव वाटला.
चंद्रकांत मांढरेची चित्रं बघताना त्यात कोल्हापूरच्या मातीचा तो गंध अक्षरशः जाणवतो. त्या चित्रांत एक अनघड असा गोडवा आहे. तो अनुभव पुन्हा पुन्हा घ्यावा वाटतो. आजच्या मॉडर्न आर्ट ,समकालीन कला या सगळ्यात त्यांची चित्रं कुठं बसतात हे सगळं माझ्यासाठी गौण आहे. ती चित्रं मला एक अनुभूती देतात. त्यात उतरलेलं कोल्हापूर आणि तिथला भवताल मी महसुस करू शकतो ही गोष्ट माझ्यासाठी खूप आनंद देणारी आहे. मला त्यांची चित्रं आवडतात.
आज त्यांचा जन्म दिन..
अन्वर हुसेन/13ऑगस्ट2021
No comments:
Post a Comment